पुणे जिल्हा : राजगुरूनगरातील समस्यांवरून राजकारण तापणार!

  • शहरात पाणी, गटार, कचऱ्याचा प्रश्‍न बिकट
  • नगर परिषदेचा अनागोंदी कारभार : नागरिक हैराण

    रामचंद्र सोनवणे
    राजगुरूनगर
    -शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे मात्र, नगर परिषदेच्या वतीने त्याप्रमाणात नागरिकांना सेवा सुविधा दिल्या जात नाहीत. शहरात पिण्याच्या पाण्याचा, गटार आणि कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. तर नगर परिषदेच्या आनागोंदी कारभारामुळे समस्या सूटत नसल्याने नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या प्रश्‍नांवरून राजकारण तापणार हे मात्र नक्‍की!

राजगुरूनगरात कचरा टाकण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने शहरातील कचरा रस्त्यावर आल्याने मोठी दुर्गंधी सुटली असून नगर परिषदेच्या अनागोंदी कारभारामुळे कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लागत नाही. कचरा वाहनचालक येथील कचरा डेपोत वाहने न नेता ती रस्त्यावरच खाली करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आणि जवळच असलेल्या पोलिसांना याचा मोठा त्रास होत आहे.

पिण्याच्या पाण्याची चास कमान धरणातून होणारी पाणी योजना अपूर्णावस्थेत आहे. स्वच्छ मुबलक पाणी मिळणार या आशेवर राजगुरूनगरकर गेली कित्येक दिवस प्रतीक्षेत आहेत; मात्र स्वच्छ मुबलक पाणी अद्यापही मिळत नाही ही योजना पूर्णत्वास जात नसल्याने आणि याकडे प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय नेते लक्ष देत नाहीत.

शहरात भुयारी गटाराचे काम सुरू आहे; मात्र त्याचा वेग अत्यंत कमी आहे. शहरातील रस्ते जागोजागी खोदले आहेत. खोदलेल्या रस्त्यांवर काम न करता दुसरीकडे नवीन खोदाखोद सुरू ठेवली जाते यामुळे अनेक रस्ते बंद ठेवले जात आहेत. एकाच बाजूकडे काम केल्यास नागरिकांना त्रास होणार नाही; मात्र ठेकेदार ते करीत नसल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

खेड पोलीस ठाण्यापासून राजगुरूनगर शहरात येणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी अवैध गौणखनिज काढताना कारवाई करून ताब्यात घेतलेली वाहने या रस्त्यावर उभी केल्याने शुक्रवारी शहरातील गढई मैदानात भरणाऱ्या बाजाराला जाणाऱ्या वाहनासाठी आणि नागरिकांना रोजच्या येजा करण्यासाठी रस्ता शिल्लक नाही. त्यातच पुढे शहरातील कचरा रस्त्यावर टाकल्याने कचऱ्यातून कशी बशी वाट काढत पुढे जावे लागत आहे. एकीकडे पोलिसांनी जप्त केलेली वाहने रस्त्यात वर्षभरापासून उभी केली आहेत तर त्यापुढे नगर परिषदेने गोळा केलेला कचरा रस्त्यावर टाकला जात असल्याने नागरिकांना गैरसोयीचे झाले आहे. हा रस्ता मोकळा करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. तर नगर परिषदेने कचरा रस्त्यात टाकू नये, अशी मागणी होत आहे.

सर्वसामान्य नागरिक वाऱ्यावर
राजगुरूनगर शहरात कचरा पाणी गटार या आरोग्याशी निगडित समस्या वाढत असून आता नव्याने नगर परिषदेच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम सुरु झाला आहे. यामुळे राजकीय नेते या प्रश्‍नाकडे लक्ष देत नाहीत. नागरिकही एकजुटीने आवाज उठवत नसल्याने प्रशासकीय यंत्रणा ढिली झाली आहे. नगर परिषदेचे कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाल्याने या सार्वजनिक गोष्टींकडे लक्ष दिले जात नसल्याने सर्वसामान्य नागरिक सुविधांपासून वंचित राहत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.