पुणे जिल्हा : तीर्थक्षेत्र अलंकापुरी अतिक्रमणाच्या विळख्यात

* नगर परिषद तात्पुरती मलमपट्टी करण्यातच मानते धन्यता
* शासकीय जागांवरही थाटले व्यवसाय
* अतिक्रमणांत आजी-माजी नगरसेवक, राजकीय पदाधिकारी अग्रभागी

एम. डी. पाखरे
आळंदी –
श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज यांची अलंकापुरी राजकीय वरदहस्ताने अतिक्रमणांच्या विळख्यात सापडली असून इंच इंच जागेवर कशापद्धतीने अतिक्रमण करता येईल, याच्या नवनवीन “क्‍लुप्त्या’ अतिक्रमणधारक करण्यात गुंग असतात. तर या अधिक्रमणधाकांमध्ये आजी-माजी नगरसेवकांसह राजकीय पदाधिकारी, कर्मचारी अग्रभागी असल्याने नगर परिषदही केवळ तात्पुरती मलमपट्टी करून “मी मारण्या सारखे करतो, तू रडण्यासार कर’ या उक्‍तीप्रमाणे कार्यवाही करीत असल्याने या राजकीय मंडळींसह इतरही अतिक्रमणधारकांचे चांगलेच फावत असल्याने रस्ते आणि शासकीय जागा इंचाइंचाने कमी होत असून शहराचा कारभार सांभाळणारेच जर असे अतिक्रमणे करण्यात मश्‍गूल असतील तर दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्‍न सर्वसामन्य आळंदीकरांनी उपस्थित केला आहे.

श्रीक्षेत्र अलंकापुरीत रोज हजारो भाविक माऊलींच्या दर्शनासाठी येतात. त्याचबरोबर अलंकापुरी नगरीला गेल्या 10 वर्षांपासून लग्नाची नगरी म्हणून नव्याने ओळख प्राप्त झाली आहे. यामुळे मंदिर परिसरासह संपूर्ण शहरात इंचइंच जागेलाही सोन्याचा भाव आला आहे. सहाजिकच अलंकापुरी “सोन्याची अंडी देणारी नगरी’ असल्याने येथे सर्वच व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. तर पालिकेच्या काही आरक्षित जागा (उदा. सार्वजनिक शौचालय, बालोद्याने, शाळा आदी) या नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जागा देखील बळकावण्यात ही मंडळी कमी पडलेली नाही.

राज्य शासनाच्या वतीने तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत शहरात गेल्या 10 वर्षांपासून रस्ते, वीज,चौकांचे सुशोभीकरण, ड्रेनेज व इतर कामे जवळजवळ 90 टक्‍के पूर्ण झाले आहेत. भाविकांसाठी पदपथ संपूर्ण शहरात पूर्ण झाले आहेत. मात्र, आळंदीकरांनी शहरातील विविध भागात असणाऱ्या पदपथावर शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवून अतिक्रमणे करीत आपापले व्यवसाय थाटले आहेत. याविषयी पालिकेकडे कोणी तक्रार केली तर त्यावर तात्पुरती मलमपट्टी करावी, तशी तोकडी अतिक्रमण कारवाई केली जाते तर जप्त केलेले साहित्य पुन्हा विनाअट परत दिले जाते, ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.

या पूर्वीच्या काळात पालिकेच्या जागेवर ज्यांनी ज्यांनी अतिक्रमणे केली आहेत व पालिकेच्या जागा हस्तगत केल्या आहेत त्यांची प्रकरणे बाहेर काढून त्या-त्या ठिकाणी पालिकेच्या वतीने फलक लावले जाणार आहेत. लवकरच त्या जागा पालिका ताब्यात घेणार आहे. पदपथावर होणारी अतिक्रमणे ही लवकरच काढली जाणार आहेत.पदपथावरील विक्रेत्यांचा बायोमेट्रिक पद्धतीने सर्व्हे सुरू असून 277 जणांची नोंद करण्यात आली आहे. एकूण 360 व्यावसायिकांसाठी ही योजना असून लवकरच कार्यवाही करण्यात येईल.
– अंकुश जाधव, मुख्याधिकारी, आळंदी नगर

नागरिकांचे म्हणणे…
शहरात मोक्‍याच्या ठिकाणी काहींनी राजकीय वरदहस्ताने किंवा आपल्या पदाच्या जोरावर, चिरीमिरी देत चक्‍क नगर परिषदेच्या जागेवरच बांधकामे करून व्यवसाय थाटले आहेत. याबाबत काहींनी न्यायालयाच्या पायऱ्या देखील चढल्या आहेत.कित्येकांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, काहींचे निकाल पालिकेच्या बाजूने लागून देखील पालिकेने पुढील कारवाई करण्याकडे अक्षम्य असे दुर्लक्ष केले असल्याचे नागरिक थेट सांगत आहेत.

जीव मुठीत घेत नगरप्रदक्षिणा
अलंकापुरीत जिल्हा नियोजन विभागाच्या वतीने पाइपलाइन, सिमटेंचे रस्ते व पदपथ तयार करण्यात आले आहेत. मात्र, नगर परिषद प्रशासनाच्या अनास्थेमुळे दोन वर्षांतच या पदपथांवर विक्रेत्यांची अतिक्रमणे पहायला मिळत आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बांधलेले पदपथ वारकरी, भाविकांसाठी निरुपयोगी ठरले आहेत. परिणामी जीवमुठीत घेऊन अवजड वाहनांची कायम वाहतूक असलेल्या रस्त्यावरुनच वारकऱ्यांना नगरप्रदक्षिणा पूर्ण करावी लागते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.