धामारीत प्राणीमित्रांची माणुसकी
शिक्रापूर – धामारी (ता. शिरुर) येथील दत्तनगर येथे एका चाळीस फूट खोल विहिरीमध्ये पडलेल्या राष्ट्रीय पक्षी मोराला शिताफीने जीवदान देत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात प्राणिमित्रांना यश आले आहे.
धामारी येथील विठ्ठल डफळ हे शेतात गेलेले असताना शेतातील विहिरीमध्ये एक मोठा मोर पडला असल्याचे त्यांना दिसले. दरम्यान, माजी सरपंच संपत कापरे यांच्या माध्यमातून निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व शिरुर रेस्क्यू टीमचे शेरखान शेख यांना याची माहिती दिली. शेरखान शेख, आपदा मित्र वैभव निकाळजे, सर्पमित्र शुभम वाघ,
राजेश मुंडकर, आयान शेख यांनी याठिकाणी धाव घेत विठ्ठल डफळ, वैभव गायकवाड, सचिन गायकवाड यांच्या मदतीने विहिरीमध्ये पडलेल्या राष्ट्रीय पक्षी मोराला शिताफीने विहिरीतून बाहेर काढले. ही माहिती शिरुर वनविभागाने वनरक्षक नारायण राठोड यांना देत मोराला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले. मोराला जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांनी देखील आभार मानले.