वाल्हे : मावडी कडेपठार गावातील कृषी पदवीधर तरुणांनी शेतीची कास धरत अल्प पाण्यावर कलिंगड आणि टरबूजाची लागवड करीत लाखो रुपयांची कमाई केली आहे. मावडी कडेपठार येथील विशाल पवार व सागर पवार या कृषी पदवीधर भावंडांची 25 एकर शेती आहे. आठ सदस्यांचे त्यांचे संयुक्त कुटुंब आहे.
पूर्वी त्यांचे ऊस हे मुख्य पीक होते. बारामती येथील कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्रांच्या मार्गदर्शनातून पवार बंधूंनी सुधारित तंत्रज्ञानावर आधारित शेतीला सुरवात केली. भाजीपाला, फळपिके, तेलबिया, चारापिके आदी पिके घेताना प्रयोगशीलताही ठेवली. पारंपरिक पिक न घेता कमी कालावधीत कमी कष्टात जास्तीत-जास्त उत्पन्न घेत जे बाजारात खपत ते चांगले विकत तेच पिकवायचे हे धोरण ठेवून मागील पाच वर्षांपासून उच्च प्रतीच्या बियाणांचे कलिंगड व खरबूज लागवड करून उत्पन्नाचा नवा विक्रम केला आहे.
पवार कुटुंबीय मागील दोन वर्षांपूर्वी 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. तसेच मागील वर्षीही जवळपास 27 लाख रूपयांचे उत्पादन मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. पवार बंधुंनी जेजुरी-मोरगाव रस्त्यावर जवळार्जुन पाटी जवळील शेतीमध्ये कलिंगड आणि टरबूजाची या नगदी पिकांची लागवड अल्प पाण्यावर मल्चिंग पेपरचा वापर करून एकाच बेडच्या साह्याने दोन पिके घेतली. शेती रस्त्यालगत असल्याने,शेतातील ताजे फळे विकून शेतकर्यांबरोबरच व्यावसायिकांचीही भूमिका बजावली.
20 एकर शेतीही घेतली भाड्याने
स्वतःची 25 एकर शेती असताना देखील, दुस-यांची भाडेतत्वावर जवळपास 20 एकर शेती घेऊन,त्यातही या पिकांची लागवड त्यांनी केली आहे.आपल्या बरोबर इतर तरूण शेतकरी शेतीक्षेत्रातील नवतरुण युवकांपुढे आदर्श निर्माण करीत त्यांना देखील शेतीच्या कामासाठी तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन करतात.शेती कधीही तोट्यात नसते;परंतु तंत्रज्ञानाचा कल्पकतेने वापर करून केली पाहिजे;असे पवार बंधूंनी सांगितले.
यंदा 35 लाखांच्या नफ्याची अपेक्षा
चालू वर्षी घरच्या शेतीत व बाहेरच्यांच्या शेतात,सिंबा जातीच्या बियाणे वापरून कलिंगडाची 8 ते 10 दिवसांच्या फरकाने 35 एकर कलिंगड टप्प्याने लागवड,तर मृदुला जातीचे खरबूजाचे बियाणे वापरून 8 एकर जमिनीवर लागवड केली आहे. उत्पादन खर्च 25 लाख एवढा आला असून सध्या 20 रूपये किलो दराने कलिंगड विक्री होत आहे.अंदाजे 250 टनांपर्यंत आत्तापर्यंत उत्पादन मिळाले असून,त्यामधून 30 टक्के होलसेल विक्री तर,70 टक्के हात विक्री करून लाखांचे उत्पन्न मिळाले असून,खर्च वजा करून 15 लाखांचे उत्पन्न मिळाले असल्याचे पवार बंधुंनी सांगितले.तसेच पवार कुटुंबीयांनी खरबूज, कलिंगड विक्री करीत असलेल्या स्टॉल जवळ, कलिंगड व खरबूज कापून 30 रूपये प्लेट प्रमाणे विक्री करीत असून,त्यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कलिंगड,खरबूज यांची थेट रस्त्यावरच विक्री..
बारामती-जेजुरी रस्त्यावरील मावडी कडेपठार परिसरातील,शेताच्या कडेला स्टॉल उभारून हंगामात दररोज पाचशे किलो,कधी एक टन तर काही वेळा कमाल दीड ते दोन टनांपर्यंतही मालाची विक्री होते. कलिंगडाला प्रति किलो 20 रुपये तर खरबुजाला कुंदन 50, मृदुला या वणास 60 रुपये दर मिळतो. .
मावडी कडेपठार (ता.पुरंदर) : येथील पवार कुटुंबायांच्या शेतातील कलिंगडाची तोडणी करताना.
मावडी कडेपठार (ता.पुरंदर) येथे आपल्या शाळेतील कलिंगड थेट स्वतः रस्त्यालगत स्टॉल लावून विकताना पवार बंधू.