विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांचे सासवड येथे आश्वासन
सासवड – आगामी पालखी सोहळा हा सुरक्षित पार पडणार असून यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पोलीस प्रशासन सर्व सोयींयुक्त व सज्ज आहे. सुरक्षित पालखी सोहळा पार पाडावा यासाठी पोलीस प्रशासन सर्व बाबींवरती काटेकोरपणे लक्ष ठेवून असल्याचे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यास पुढील महिन्यापासून सुरुवात होते आहे. या पालखी सोहळ्याची तयारी व पालखी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर सुनील फुलारी यांनी नीरा ते सासवड असा दौरा केला. यात त्यांनी पालखी सोहळ्याचे नियोजन पालखीचे मुक्काम तळ, पालखी विसावा व पालखी महामार्गाची पाहणी केली.
पालखी सोहळ्यासाठी आवश्यक बाबींची माहिती घेत या गोष्टींची चर्चा करत संबंधित ठिकाणच्या अधिकारी व सन्मवयक यांच्याशी चर्चा केली. सुनील फुलारी यांनी सोमवारी (दि. 22) रात्री 9.30 वाजता सासवड येथील पालखी तळास भेट देत या ठिकाणी पालखीतळाच्या पालखी मुक्काम व्यवस्थेच्या आराखड्याचा पालखी तळावरील सोयी-सुविधांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण आनंद भोईटे, भोर उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील, सासवडचे निरीक्षक अण्णासाहेब घोलप, सहायक निरीक्षक विनोद महांगडे, सासवड नगरपालिकेचे नगरसेवक अजित जगताप, सासवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गिरमे, मोहन चव्हाण, मजी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी दादा भुजबळ, पोलीस हवालदार रुपेश भगत, पोलीस हवालदार लियाकत मुजावर यांसह सासवड नगरपालिकेचे कर्मचारी देखील उपस्थित होते. सासवडचे माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. यासोबतच सासवड नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांच्याकडून सुनील फुलारी यांनीर सर्व माहिती जाणून घेत सूचना केल्या.
प्रशासनाकडून सर्व विभागांना सूचना
पालखी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी सर्वच निगडित विभाग यामध्ये आरोग्य विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस प्रशासन या सर्वांना पोलीस प्रशासनाने सर्व सूचना दिलेल्या आहेतच. सोबत यांच्याशी समन्वय देखील साधत पोलीस प्रशासन यावर्षीचा पालखी सोहळा हा सुरक्षित पार पाडला जावा, यासाठी प्रयत्नशील आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर सुनील फुलारी यांनी दिली.