वाल्हे : जवळपास एक-दिड महिन्यापासून वातावरणातील विविध बदल पिकांवर विविध रोगराईला निमंत्रण देत आहोत. कांदे, गहू, हरभरा,ज्वारी, भाजीपाला हे सर्व कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची तसेच लागवड केलेल्या कांद्याचे, तसेच काढणीला आलेल्या कांदे यांचे नुकसान होण्याच्या भितीने शेतकरी धास्तावले आहेत. पहाटेच्या वेळी धुके व दवबिंदू पडत आहे.
यामुळे लाल कांदा, उन्हाळी कांद्याच्या रोपांवर तसेच लागवड केलेल्या कांद्यावर, करपा व मर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. यामुळे महागड्या औषधांची फवारणी करून शेतकरी पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. नगदी पिक म्हणून वाल्हे (ता. पुरंदर) परिसरामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, लागवड केलेल्या कांद्याला तसेच काढणीला आलेल्या कांद्याच्या पिकांवर मागील काही दिवसांपासून रात्री धुके व पहाटे दवबिंदू, दिवसभर ढगाळ वातावरणामुळे त्यावर करप्याचा प्रादुर्भाव होत आहे. दररोज धुके पडत असल्याने, कांदा उत्पादन शेतकरीवर्ग अडचणीत सापडत आहे.
सध्या कांद्याला मिळणारा बाजारभाव कमी प्रमाणात असून सध्याच्या कांद्याच्या लागवडीचा खर्च देखील वसुल होणे अवघड होत असल्याचे कांदा उत्पादक शेतकरीवर्गाने सांगितले. मात्र सध्याच्या वातावरणातील बदलामुळे पुढील काही दिवसांत कांदा उत्पादन अल्प प्रमाणात होणार असल्याने, भविष्यात तरी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेवर, शेतकरी मिळेल तेथून महागडी कांदा रोपे आणून लागवड करताना दिसत आहे.
मात्र,सद्यःस्थितील वातावरणातील बदल, तसेच पडत असलेल्या धुके व दवबिंदूमुळे कांदापात पिवळी पडत आहे.लागवड केलेल्या कांद्यावरही या धुक्याचा परिणाम होत आहे.