भोर -भोर तालुका पंचायत समितीच्या आंबवडे, नेरे, भोंगवली, जोगवडी व नसरापुर या पांच प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी 1 याप्रमाणे 5 रुग्ण वाहिकांचे लोकार्पण आज (दि. 1) भोर तालुका पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, रुग्णवाहिकेसाठी 14 व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर करण्यात आला असून, त्यावर तसा उल्लेख नसल्याने सरपंच परिषदेने नाराजी व्यक्त केली आहे. 14 व्या वित्त आयोगाचा उल्लेख न करता जिल्हा परिषदेच्या नावाचा उल्लेख केला आहे. जिल्हा परिषदेने याचे श्रेय लाटू नये, असा संतप्त सूर पदाधिकाऱ्यांनी आळवळा.
या लोकार्पण सोहळ्यावेळी भोर पंचायत समितीच्या उपसभापती दमयंती जाधव, सदस्या पुनम पांगारे, जि. प. सदस्य विठ्ठल आवाळे, जि. प.सदस्या शलाका कोंडे, माजी उपसभापती अमोल पांगारे, तालुका वैद्यकीय आधिकारी डॉ. सूर्यकांत कराळे, सरपंच परिषदेच्या अध्यक्षा रेखा टापरे, हातनोशी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद थोपटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुश खंडाळे, महेश खुटवड, शंकर सणस, संतोष तुपे आदींसह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित होते.
रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी भोर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांना सरपंच परिषदेने लेखी पत्र देऊन 14 व्या वित्त आयोगाचा निधी काही अटी-शर्थींवर देण्याचा प्रस्ताव दिला होता. 14 व्या वित्त आयोगाचा निधी हा केंद्र सरकारचा असून यात जिल्हा परिषदेचा किंवा राज्यशासन अथवा कोणत्याही लोकप्रतिधीचा संबंध नसल्याने या रुग्णवाहिकांवर जिल्हा परिषदेचे नाव टाकून 14 व्या वित्त आयोगाचा कोठेही उल्लेख न करता जिल्हा परिषद श्रेय कसे काय घेऊ शकते, असा प्रश्न सरपंच परिषदेने उपस्थित केला आहे.
पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ग्रामंचायतींच्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून 51 रुग्ण वाहिका खरेदी केल्या आहेत. पैकी 5 रुग्णवाहिका भोर तालुक्यासाठी देण्यात आल्या आहेत. काहीही असले तरी या रुग्णवाहिका तालुक्याला वरदान ठरणार असल्याने लोकांमध्ये मात्र समाधान आहे.
लोकार्पण करण्यात आलेल्या या रुग्ण वाहिकांवर केंद्र सरकारच्या 14 व्या वित्त आयोगाचा उल्लेख न करता जिल्हा परिषदेच्या नावाचा उल्लेख केला आहे. जिल्हा परिषदेने याचे श्रेय लाटू नये. याबाबत सरपंच परिषदेमध्ये नाराजी आहे.
– रेखा टापरे, अध्यक्षा, सरपंच परिषद
भोर तालुक्यातील 156 ग्रामपंचायतींमधील प्रत्येक नागरिकाच्या खर्चातील 45 रुपये असे एकूण 75 लाख 44 हजार 790 रुपये दिले असून, यातून या रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या असल्याने या रुग्णवाहिकांवर 14 व्या वित्त आयोगाचा उल्लेख करणे आवश्यक होते.
प्रमोद थोपटे, सरपंच, हातनोशी, ता. भोर
तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका जीर्ण व नादुरुस्त झाल्याने तालुक्यातील सर्वच ग्राम पंचायतींना 14 व्या वित्त आयोगातील निधीतून नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार बैठकाही घेतल्या होत्या. त्यामुळे आज तालुक्यातील लोकांना आरोग्य सेवेसाठी या रुग्णवाहिका मिळाल्या असून, याचा तालुक्यातील गोरगरिबांना उपयोग होणार आहे.
श्रीधर किंद्रे, सभापती