पुणे -पुणे जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातील मध्यम स्वरुपाची तसेच तीव्र कुपोषित बालकांचा शोध घेण्यासाठी तपासणी केली जाणार आहे. त्यामध्ये 0 ते 6 वयोगटातील बालकांचा समावेश असून, जिल्हा परिषदेने आजपासून अंमलबजावणी सुरू केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा परिषदेत मतदारसंघातील नागरिकांच्या तक्रारीसंदर्भात नुकतीच बैठक घेतली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेने सुमारे दीडशेहून अधिक मुले ही कुपोषित बालके असल्याची माहिती सादर केली होती. त्या माहितीनंतर “पुणे जिल्हा कुपोषणमुक्त करा’, अशी सूचना सुळे यांनी केली होती. त्यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला असून, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
पुणे जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचे उद्दिष्ठ लक्षात ठेऊन जिल्ह्यातील 0 ते 6 वर्षे वयोगटातील तीव्र व मध्यम कुपोषित बालकांची तपासणी करून दत्तक देण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार मोहिमेची बैठकही यापूर्वी घेण्यात आली आहे. त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. येत्या डिसेंबरपर्यंत बालकांची तपासणी करण्यात यावी आणि त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करावा, असे आदेशही देण्यात आल्याची माहिती प्रसाद यांनी दिली.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतंर्गत पुणे जिल्हा कुपोषणमुक्त मोहीम राबविण्याचा निर्णय जिल्हास्तरवार घेण्यात आला आहे. या मोहिमेत 0 ते 6 वयातील सर्व तीव्र व मध्यम कुपोषित बालकांचा शोध घेऊन त्याची तपासणी उपकेंद्राच्या स्तरावर आरोग्य अधिकाऱ्यांनी करावी, अशा सूचना दिल्या आहेत.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद