पुणे जिल्हा: आता मिशन “कारभारी’!

रोहन मुजूमदार 

पुणे – जिल्ह्यातील 747 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 98 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर 649 ग्रामपंचायतींसाठी “रण’ पेटले होते. सोमवारी (दि. 18) निवडणुकीची मतमोजणी झाली. त्यात अनेक दिग्गजांना मात देत नवीन चेहऱ्यांना मतदारांनी गावविकासाची संधी दिली. आता सरपंचपद आपल्याकडेच ठेवण्यासाठी राजकीय मंडळीकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तर आपल्या गावचे सरपंचपद कोणत्या गटासाठी निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य सरकारने यापूर्वीच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडती रद्द केल्यामुळे नव्याने सोडती होणार असून, मतदानाच्या दिवसानंतर पुढील 30 दिवसांमध्ये म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत सरपंच आणि उपसरपंचपदांच्या निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आरक्षणानंतर जातीचा दाखला अमान्य होणे, जातीच्या दाखल्यांची पडताळणी वेळेत न होणे, बनावट प्रमाणपत्र सादर करणे यांसारख्या प्रकारांमुळे राज्य सरकारने आरक्षण सोडती रद्द केल्या.

आता निवडणूक निकालाची अधिसूचना गुरुवारी (दि. 21) प्रसिद्ध होणार आहे. सरपंच आणि उपसरपंच या पदांची निवड प्रक्रिया ही मतदानानंतर 30 दिवसांच्या आत राबविण्याच्या सूचना राज्य सरकारकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार 15 फेब्रुवारीपर्यंत सरपंचपदांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

लवकरच आरक्षण निघेल मग बहुमतासाठी जुळवाजुळव करावी लागेल. त्या दिशेने जर तरचा विचार करीत आपले कोणते सदस्य निवडून येतील. कुणाची कशी मदत होऊ शकते. याबाबत खलबते सुरू झाली आहेत. पूर्वतयारी करताना गुप्त बैठका घेतल्या जात आहेत. तर काही जण नंतरचे नंतर बघू म्हणत सध्या काहीच ताणतणाव नको म्हणत विषय बाजूला सारत आहेत.

दरम्यान, सरपंचपद राजकीयदृष्ट्या वजनदार आहे. त्यात जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोठे बाजार, महामार्ग, एमआयडीसी, उद्योगधंद्यांची भरभराट यामुळे हे पद प्रतिष्ठेचे असल्याने ते मिळवण्यासाठी कार्यकर्तेही “फिल्डिंग’ लावत आहेत. त्यामुळे गुरुवारनंतर पुन्हा सरपंचपदाचे “रण’ पेटणार हे निश्‍चित!

दिग्गज पराभूत; नवख्यांना संधी
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये धक्‍कादायक निकाल समोर आले. मतदारांनी दिग्गजांना बाजूला सारत नवख्यांना संधी दिली. निकाल हा काही राजकीय मंडळीसाठी धक्‍कादायक लागला. जनतेने ज्या गटाला कौल दिला, त्या गटाचे जास्त सदस्य निवडून आले. यानंतर सरपंचपदाचे आरक्षण निश्‍चित झाल्यानंतर ग्रामपंचायतीची सत्ता कोणाच्या हातात येणार, हे कळणार आहे.

फोडाफोडीच्या राजकारणाला वेग
या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांना आपल्या गटाकडे कसे ओढता येईल यादृष्टीने देखील अनेकांनी फासे फेकणे सुरू केले आहे. सरपंचपद आपल्याच गटाकडे राहावे यासाठी काही राजकीय मंडळींकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काट्याच्या लढती पहावयास मिळाल्या. तर आता सरपंचपद मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र, नेमके आरक्षण काय निघणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.