मुळशी प्रादेशिक नळयोजनेला कोरड ः धरणातील साठा खालावला
पौड – मुळशी धरणावरून मुळशी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित असून यातून 21 गावांना पाणी पुरवठा केला जातो. या योजनेत पिरंगुट, कासारआंबोली, घोटावडे, पौडसारखी मोठी गावे समाविष्ट करण्यात आलेली आहे; मात्र मुळशी धरणाचा कधी नव्हे एवढा पाणीसाठा खालावला असल्याने प्रादेशिकच्या पाईपाच्या खाली पाणी गेल्याने योजना अडचणीत आलेली आहे.
मुळशी धरणाची पाणी पातळी खालाविली असून, धरणावर अवलंबून असलेल्या मुळशी प्रादेशिकच्या पाणी पुरवठा योजनेतील गावांना दिवसाआड पाणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवसाआड पाणी देण्याबाबत ग्रामपंचायतींना मुळशी प्रादेशिक नळ पाणी पुरवठाकडून पञही देण्यात आलेले आहे.
यावर मुळशी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. सध्या वीज निर्मितीसाठी लागणारे पाणी, कडक उन्हाळा, पाण्याची वाढत असलेली मागणी, शेतीसाठी उपसा यामुळे धरणाचे पाणी कमी होऊ लागले आहे.
मुळशी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा यांच्याकडून मिळालेल्या पत्रानुसार चाले, सावरगाव, करमोळी गावाला सुद्धा दिवसाआड पाणी सोडले जाणार आहे.
-राणी अडसूळ, ग्रामसेविका
पुढील काही दिवसांत धरण परिसरात मोठा पाऊस झाला नाही तर पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. मुळशी प्रादेशिक योजनेवर असलेल्या गावच्या ग्रामपंचायतींनी पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच ग्रामस्थानीही पाण्याची नासाडी न करता पाणी जपून वापरावे.
-सुनील पटेकरी, उपअभियंता, मुळशी प्रादेशिक योजना