सर्व नवांगतांची मिरवणूक : प्रवेश सोहळा दातृत्वमय
पारगाव – दौंड तालुक्यातील पारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध उपक्रमांनी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सर्व नवांगत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग भेट म्हणून दिली. प्रत्येकी एक गरीब विद्यार्थ्याला चौथीपर्यंत शैक्षणिक पालक दत्तक घेण्यात आले. उद्योजक, दातृत्व असलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानमंदिराची कवाडे उघडली.
पारगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत सर्व उपस्थित विध्यार्थ्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध रंगाच्या फुग्यांनी सजवलेली शाळेची कमान बालचमूंचे लक्ष वेधून घेत होती. नवोगत विद्यार्थ्यांना गुलाबाचे पुष्प व कागदी टोप्या देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी नवोगत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची भीती न जाणवता हास्य उमटले होते. यावेळी माजी सरपंच सर्जेराव जेधे यांच्या वतीने सर्व नवोगत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग भेट म्हणून देण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विशाल ताकवणे, उद्योजक मनोज बोत्रे व शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष नितीन बोत्रे यांनी प्रत्येकी एक गरीब विद्यार्थ्याला इयत्ता चौथीपर्यंत शैक्षणिक पालक दत्तक घेतले. विशाल ताकवणे यांनी सर्व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून शेंगदाणा लाडूचे वाटप केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन बांदल यांच्या वतीने अल्पोपहार व सालू मालू मित्र मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना बिस्कीट पुडे देण्यात आले.
यावेळी सरपंच सुभाष बोत्रे, पंचायत समिती सदस्य सयाजी ताकवणे, माजी सरपंच सर्जेराव जेधे, दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पोपटराव ताकवणे, माजी सरपंच जयश्री ताकवणे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संजय ताकवणे, वैभव बोत्रे, समीर बोत्रे, गणेश बोत्रे, ग्रामविकास अधिकारी मुरलीधर बडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन बांदल. केंद्र प्रमुख शाम बेंद्रे, सर्व शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.