पुणे जिल्हा: करोनाच्या सावटाखाली नवरात्रोत्सवास प्रारंभ

मंडप डेकोरेटर्स, मूर्ती व्यावसायिक अडचणीत

काऱ्हाटी  -दरवर्षी धुमधडाक्‍यात साजरा होणारा नवरात्रोत्सव यंदा गणेशोत्सवाप्रमाणे करोनाच्या सावटाखाली साजरा होत आहे.. सार्वजनिक मंडळाकडून मूर्तींची मागणी घटली असून मूर्तीची उंची देखील कमी झाली आहे. याशिवाय मंडळांची संख्याही कमी असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मूर्तिकार व मंडप डेकोरेटर व्यावसायिक मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहेत.

सर्वत्र लॉकडॉन हटवून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अजूनही अनेक निर्बंध कायम आहेत. नवरात्र उत्सव करोनाच्या छायेत आहे. यावर्षी दुर्गा मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. कामगारांची अडचण, कच्च्या मालाचे वाढते भाव आदी अडचणींना तोंड द्यावे लागले आहे.

मंडप डेकोरेटर व्यवसायावरही परिणाम जाणवला आहे. अनेकांनी कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, करोनरमुळे काम मिळत नसल्याने व्यावसायिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. मंडप व्यावसायिक बापू मदने म्हणाले की, लग्न कार्यक्रम, उत्सव, सण यावर आमचा व्यवसाय अवलंबून आहे. करोनामुळे सर्व कार्यक्रम साधेपणाने साजरी होत असल्याने हाताला काम मिळणे कठीण
झाले आहे.

पळशीचे मूर्तिकार हनुमंत कुंभार म्हणाले की, मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या भावात 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. गणेशोत्सवात अपेक्षित व्यवसाय झाला नाही. आता नवरात्रोत्सव मूर्ती बुकिंगसाठी प्रतिसाद मिळाला नाही.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.