राजुरी/बेल्हे -आळेफाटा (ता. जुन्नर) बसस्थानकाच्या मागील बाजूस मोकळ्या असलेल्या जागेत एका तीस ते पस्तीस वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि. 9) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच या घडलेल्या घटनेबाबत माहिती घेतली. या परिसरात आजुबाजूला असलेल्या दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे.
खून झालेल्या या व्यक्तीची ओळख पटली नसून घटनास्थळी असलेल्या परिस्थितीवरुन हा व्यक्ती कामासाठी बाहेर गावाहून या ठिकाणी आला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. हा खून नेमक्या कोणत्या कारणाने झाला आहे. हे अद्याप समजू शकले नाही.