बारामती : देशात फार पूर्वीपासून भरड धान्याची शेती होती; पण आता त्याचे प्रमाण फार कमी झाले आहे. त्यांच्या किमती वाढत आहेत. कोदो, कुटकी, सावा, राळा, वरई, भादली, नाचणी, राजगिरा, ज्वारी, बाजरी या सर्वच भरड धान्ये वा मिलेट्सचे सेवन वाढवले पाहिजे. ते आरोग्यवर्धक आहेत. भरड धान्यांना स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मागणी वाढावी, महत्त्व लोकांपर्यंत पोहचावे, भरडधान्याची प्रचार आणि प्रसिद्धी होण्यासाठी बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलप्मेंट ट्रस्ट संस्थेने आधुनिक आणि सर्व सुविधांनी उपयुक्त अशा देशातील पहिल्या भरडधान्य प्रक्रिया केंद्राची स्थापना केली आहे.
अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक स्वयंसहाय्यता गट शेतकरी उत्पादक संस्था सहकारी संस्था आणि स्टार्टअप यांना क्षमता बांधणी प्रशिक्षण आणि इतर अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना प्रोत्साहन देणे हा या सेंटर स्थापनेमागचा प्रमुख उद्देश आहे. केंद्रामध्ये भरडधान्यावर प्रक्रिया करून नवनवीन पदार्थ बनविले जातात.
उत्पादित पदार्थांची पाककृती सुधारली जाते. पदार्थांचे अन्न तपासणी प्रयोगशाळेत तपासणी जाते, तपासणीनंतर आकर्षक, असे लेबेल तयार करून पॅकेजिंग केले जाते. उत्पादित पदार्थांना मार्केट मिळवण्यासाठी सहाय्य केले जाते, अशा प्रकारे उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देणारे देशातील आणि राज्यातील एकमेव केंद्र आहे.
शेतकरी बांधवांनी प्रात्यक्षिक आधारित तंत्रज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी केले आहे.
मिलेट दालन लक्षवेधी ठरणार
यंदाच्या कृषिकमध्ये मिलेट दालन उभारण्यात येत आहे. दालनामध्ये भरडधान्य लागवड, भरडधान्य काढणी, भरडधान्यावरती प्राथमिक प्रक्रिया, भरडधान्य दुय्यम प्रक्रिया, विक्री केंद्र आणि खवय्यांसाठी भरडधान्यांपासून बनणाऱ्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मिलेट कॅफे या सर्व गोष्टी एकाच छताखाली शेतकऱ्यांना पाहता येणार आहेत. हे मिलेट दालन उभारण्याचा उद्देश म्हणजे ऊर्जा व पोषण देणाऱ्या ‘मिलेट’ वा भरड धान्यांपासून मिळणारे आरोग्यसंबंधीचे फायदे, याविषयी जनजागृती आवश्यक आहे. लागवडीपासून, धान्यावर प्रक्रिया, प्रक्रियायुक्त पदार्थांचे ब्रँडिंग, मार्केटिंग याविषयी परिपूर्ण माहिती शेतकरी, महिला बचत गट, वैयक्तिक सूक्ष्म उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपनी यांना एकाच एकाच छताखाली उपलब्ध होईल.