वीसगाव खोरे : भोलावडे (ता.भोर) येथील प्रयोगशील शेतकऱ्याने किवत (ता.भोर) येथील आपल्या माळरानावर करोना काळात २०२० साडे चार एकरात आंब्याची झाडांची लागवड केली. यात ४०० केसर, १०० हापूस आंब्याची लागवड केली. करोना काळात परिस्थितीवर मात करण्यासाठी आंब्याचा जोड व्यवसाय सुरू केला होता.परंतु आता तोच मुख्य व्यवसाय बनला आहे. केशर आणि हापूस जातीच्या आंब्याची लागवड केल्याने वर्षाकाठी अडीच लाखाचे उत्पन्न मिळत आहे.
प्रगतशील शेतकरी हेमंत भुजंगराव दाभाडे याने २५० झाडे १५ फूट बाय ५ फुटावर इस्राईल पध्दतीने लावली आहेत. तसेच २५० झाडे सलग पध्दतीने १५ फूट बाय २० फूट लावली आहेत. त्याचबरोबर २०० नारळाच्या झाडांची लागवड केली आहे. पी. व्ही. पाटील मार्गदर्शन करीत आहेत. सेंद्रिय पध्दतीने शेणखत व गाईचे शेण, काळी मातीपासून जीवामृत तयार करून झाडांना टाकले जाते. कीटक नाशकांची फवारणी महिन्यातून दोन वेळा केली जाते. साडेचार एकर आंबा बागेत बोअरवेलचा वापर करून सर्व झाडांना ठिबकद्वारे पाण्याचे योग्य नियोजन करून फळबाग जोपासली. झाडांना शेणखत, निंबोळी पेंट, अख्खी निंबोळी वेळोवेळी टाकली. तसेच दशपर्णीची फवारणी केली. गेल्या वर्षांपासून आंब्याचे उत्पन्न सुरू झाले आहे.
यंदाचा आंब्याचे हंगामाचे दुसरं वर्ष असून आंब्यांना चांगला मोहोर आला आहे .पाण्याचं योग्य नियोजन,तण नियंत्रण, जैविक खते,किड नियंत्रण केल्याने चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.पांरपारिक पद्धतीने फळ पिकविल्याने ग्राहकांची मागणी चांगली आहे.
– हेमंत दाभाडे, प्रयोगशील शेतकरी,भोलावडे
कैरी बाठाला आल्यानंतर पाणी देणे बंद करून टाकले. फळांना उन्हामुळे डाग पडू नये म्हणून संरक्षणासाठी कागदी पिशवी बसवली जाते. आंबा तोडण्यासाठी तयार झाल्यानंतर व्यवस्थित देठासह तोडणी केली जाते. पांंरपरिक पद्धतीने तोडलेली फळे भाताच्या पेंढ्यात पिकवत असल्याने फळांना आकर्षक रंग येतो. फळ ताजेतवाने दिसते, चविला चविष्ट बनते, त्यामुळे फळांना चांगली मागणी आहे.
पिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे रासायनिक औषधांचा वापर केला जात नाही. पिकलेले आंबे बॉक्समध्ये भरून पुणे,मुंबईला मार्केटला पाठवली जातात. पुण्याची बाजारपेठ तासाभराच्या अंतरावर असल्याने पिकलेले फळ मार्केटमध्ये गेल्यावर लगेच खपते. चांगला भाव मिळतो.