आमदार जगतापांसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न
राहुल शिंदे
नीरा – पुरंदर तालुक्यातून आता सध्या सर्वच पक्षातील नेत्यांना आमदारकीचे स्वप्न पडू लागल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक नेते आता गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असताना पाहायला मिळत आहेत. पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्यासमोर मोठा आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न सर्वच पक्षामधून केला जात असला तरी अनेक पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने कोणाची वर्णी विधानसभेसाठी लागते हे पाहणे महत्त्वाचे आहे.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून सध्या बाहेरून आलेल्या काही लोकांना आमदारकीची स्वप्न पडत आहेत. तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांना यावेळी पुन्हा एकदा संधी द्यावी, असा मानणारा देखील मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. तर महाविकास आघाडीतील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे हे विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असले तरी ही जागा विद्यमान आमदार संजय जगताप यांच्यासाठीच सोडली जाण्याची शक्यता अधिक असल्याने झेंडे अपक्ष लढणार का हे येणारा काळच सांगेल. शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून माजी मंत्री विजय शिवतरे पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. मागील वेळेस पराभव झाला असला तरी यावेळेस त्या पराभवाचा वचपा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. त्यातच त्यांना आता महायुतीमधून संधी मिळेल, असा विश्वास आहे.
महायुतीत रस्तीखेच होण्याची शक्यता
महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटकपक्ष जर पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात एकत्र लढले तर महाविकास आघाडीकडून जागा काँग्रेसलाचा सुटणार हे जवळपास निश्चितच आहे. तर महायुतीत चांगलीच रस्सीखेच होणार हे जरी सत्य असले तरी ही जागा शिवसेनेला (शिंदे गट) सुटण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपमध्ये इच्छुकांचा भरणा अधिक
पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात सध्या सर्वात जास्त इच्छुक उमेदवार असलेला पक्ष कोणता असेल तर तो म्हणजे भाजप. सध्या माजी आमदार अशोकराव टेकवडे, माजी मंत्री दादा जाधवराव यांचे पुत्र बाबाराजे जाधवराव, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि कात्रज दूध संघाचे माजी संचालक गंगाराम जगदाळे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तर भाजपमधून घाटाखालील (हवेलीतील) काही उमेदवार देखील इच्छुक असल्याचे पाहायला मिळते. मात्र सध्या तरी त्यांनी आपण उमेदवारीसाठी इच्छुक आहोत असे सांगितलेले नाही किंवा तशा पद्धतीने ते काम करत नाहीत. मात्र संधी मिळाली तर त्याचे सोने करून असे अनेक जण बोलून दाखवत आहे.
ते येणारा काळच सांगेल
आमदार संजय जगताप मागील वेळेस चांगल्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यावेळेस त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकद देण्याची उभी होती; मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेले आहेत. एक गट आघाडी सोबत तर दुसरा गट युती सोबत आहे. अजित पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग पुरंदरमध्ये आहे आणि म्हणूनच मागील निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी आवाहन केल्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्या पाठीशी उभी राहिली होती. त्यामुळेच विजय शिवतरे यांचा पराभव झाला होता; मात्र सध्या अजित पवार हे युतीमध्ये आहेत आणि याचा फायदा विजय शिवतारे यांना होणार का, की विरोधकांना फायदा अधिक होणार हे येणारा काळच सांगेल.
पवार, सुळेंची भूमिका ठरणार महत्त्वाची
खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीवेळी पुरंदरमधून मोठे मताधिक्य मिळाले होते तर या लोकसभा निवडणुकीत आमदार संजय जगताप हे देखील सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते आणि म्हणूनच शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे आमदार संजय जगताप यांना मदत करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.