– दोन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर,मुख्याधिकारी गोविंद जाधव यांची माहिती
मंचर – माझी वसुंधरा अभियान 4.0 या पुरस्काराची घोषणा महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने शुक्रवार, दि.२७ रोजी केली. आंबेगाव तालुक्यातील मंचर नगरपंचायतीने माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये भाग घेतला होता. यात पंधरा ते वीस हजार लोकसंख्या गटासाठी माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये राज्यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार व त्यासाठी दोन कोटी रुपये बक्षीस जाहीर झाले आहे, अशी माहिती मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी शनिवार, दि.२८ रोजी दिली.
मागील वर्षी ९४ व्या क्रमांकावर असलेल्या मंचर नगरपंचायतीने यावर्षी थेट द्वितीय क्रमांकावर मजल मारली म्हणून “उंच उडी ” या घटकाअंतर्गत विशेष पारितोषिक म्हणून एक कोटी रुपये आणि आता जाहीर झालेला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार व त्यासाठी दोन कोटी रुपये, असे एकूण तीन कोटी रुपयांची रक्कम नगरपंचायतीला मिळणार आहे. या अभियानामध्ये महाराष्ट्र राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था, २२ हजार २१८ ग्रामपंचायती अशा एकून २२ हजार ६३२ स्थानिक संस्थानी भाग घेतला होता.
भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूत तत्त्वांवर आधारित असलेल्या या अभियानामध्ये मंचर नगरपंचायतीने शहरात विविध उपक्रम राबविले असतात. यामध्ये श्रमदान, घनकचरा व्यवस्थापन, एकल प्लॅस्टिक वापर बंदी, पर्यावरण पूरक गणेशोत्सव, पर्यावरण सेवा योजना, वातावरणीय बदल परिणाम अंतर्गत कार्यशाळा, वृक्षगणना अहवाल, ध्वनी व वायू प्रदूषण आधारित जनजागृती उपक्रम, तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मंचर नगरपंचायतीने पर्यावरण संवर्धनासाठी ६० हजारांपेक्षा अधिक वृक्ष लागवड केली आहे.
११ हरित क्षेत्रांची निर्मिती करून मियावाकी उद्यानासारखा कौतुकास्पद प्रकल्प पूर्णत्वास नेला. पर्यावरण जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात आल्याने हा सन्मान मिळालेला आहे. यावर्षी द्वितीय क्रमांक मिळाला असून पुढच्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी मंचर नगरपंचायत व नागरिक अजून गतिमान पद्धतीने काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सर्व स्तरातून मुख्याधिकारी गोविंद जाधव व अन्य अधिकारी वर्गावर अभिनंदनचा वर्षाव सुरू असून मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी सर्व मंचर शहरवासीयांचे देखील अभिनंदन केले आहे.