महादेव जानकर : भीमथडी साहित्य संमेलन उत्साहात
यवत – सध्याच्या काळातील शिक्षण व्यवस्था, जातीयता, विषमता आणि विकासाच्या नावाने रंगवलेले चित्र समाजाच्या हिताचे नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांची पोरं सत्तेत येत नाही, तोपर्यंत पिळवणूक थांबणार नाही. साहित्यातून समाज मन घडविण्यासाठी लेखणीची तलवार संघर्षासाठी सज्ज ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले.
चौफुला (ता. दौंड) येथे राज्यस्तरीय चौथे भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन महादेव जानकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी म. भा. चव्हाण होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने राज्यस्तरीय चौथे भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे दोन दिवसीय आयोजन केले होते. स्वागताध्यक्षपदी प्रमोद ढमाले, निमंत्रक सुयश देशमुख व सहनिमंत्रक मोहन जाधव हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संभाजीराव कुंजीर,सागर फडके, भाऊसाहेब फडके, संजय सोनवणे, कैलास शेलार, दत्तात्रय डाडर, बदाम माकर उपस्थित होते.
भीमथडी मराठी साहित्य संमेलनाची सुरूवात श्री बोरमलनाथ महाराजांना भीमेच्या पाण्याचा जलाभिषेक व ग्रंथदिंडी काढून करण्यात आली. ग्रंथदिंडीत कवी, लेखकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद,कलारंग व सांस्कृतिक कार्यक्रम, कविसंमेलन व समारोप आदी भरगच्च कार्यक्रमाने साहित्य संमेलन रंगतदार झाले.
जानकर म्हणाले, सध्याची सामाजिक परिस्थिती भयावह असून जनता संभ्रमित आहे. नीती, तत्वाची चाड राहीली नाही. भीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कवी, लेखक, साहित्यिक यांना एक चागलं विचारपीठ निर्माण झाले आहे. भीमथडीच्या मातीतून प्रेरणा घेऊन दिल्लीच्या तख्ताला धडक दिली. हा प्रेरणा देणारा इतिहास पुन्हा एकदा घडवावा लागेल. पाच एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाचे मराठी साहित्य भवन उभारण्यासाठी मी साहित्य परिषदेच्या सोबत आहे. साहित्यिकांना न्याय देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करीन. यावेळी संमेलनास एक लाख रुपये निधी देण्याचे कबूल केले.
संमेलनाचे मूख्य संयोजक, ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव म्हणाले, साहित्य हा संस्कृतीचा मोलाचा ठेवा आहे, तो जपण्यासाठी वास्तववादी साहित्य निर्माण झाले पाहिजे. हरवत चाललेला वाचक आणि मोबाइलमध्ये अडकत गेलेली पिढी हे मोठे आव्हान कवी, लेखकांपुढे आहे. लिहिणारे हात आणि बोलणारे वक्ते वाढविण्यासाठी विभागवार साहित्य संमेलन करणे गरजेचे आहे. साहित्याशिवाय समाज सक्षम होणार नाही. पत्रकार, कवी, लेखक धडपणाखली काम करीत आहेत.
यावेळी बाळासाहेब मुळीक, सुशांत जगताप, अरविंद जगताप, रामचंद्र नातू, राजाभाऊ जगताप, रवींद्र खोरकर, संदीप सोनवणे, विठ्ठल थोरात, आनंदा बारवकर, डॉ. अशोकराव जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रवी पवार यांनी केले. दीपक पवार यांनी आभार मानले.
विज्ञानाच्या कसोटीवरील साहित्यच जिवंत
संमेलनाध्यक्ष म. भा.चव्हाण म्हणाले, ”सत्याची कास धरत नवीन लेखकांनी लेखन करायला हवे. विज्ञानाच्या कसोटीवर निर्माण झालेले साहित्य जिवंत राहते. राज्याच्या अनेक भागातून साहित्यिक भीमथडी साहित्य संमेलनामध्ये सहभगी झाले होते, अशा संमेलनांना शासनाने आर्थिक मदत करण्याची गरज आहे.