पुणे जिल्हा: लोणी काळभोरचा बाजार आजपासून बंद!

तीन दिवस भाजीपाला तर शनिवारचा आठवडे बाजार भरणार नाही

लोणी काळभोर -करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन येत्या गुरुवार (दि. 18) पासून पुढील तीन दिवस लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील भाजीपाला बाजार व शनिवार (दि. 20) चा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सरपंच राजाराम काळभोर यांनी दिली आहे.

दरम्यान, लोणी काळभोरप्रमाणेच उरुळी कांचन परिसरातील भाजीपाला बाजार आणि आठवडे बाजार काही काळ बंद ठेवण्याची मागणी उरुळी कांचन परीसरातील नागरिकांनी केली आहे.

पूर्व हवेलीमधील लोणी काळभोर आणि उरुळी कांचन या दोन्ही मोठ्या ग्रामपंचयत हद्दीतील 10 दिवसांपासून करोनाचे थैमान सुरू आहे. मागिल 10 दिवसांच्या कालावधीत उरुळी कांचन हद्दीत 90 पेक्षा अधिक तर लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत 110 नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे निदान झालेले आहे.

यामुळे दोन्ही ग्रामपंचायतीच्या प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. लोणी काळभोरच्या उपसरपंच ज्योती काळभोर म्हणाल्या की, ग्रामपंचायत प्रशासन करोनाला हटवण्यासाठी जनजागृती करीत असले तरी, नागरिक मास्कशिवाय फिरत आहेत, यामुळे आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव म्हणाले, करोना रोगाच्या वाढत्या पार्श्‍वभूमीवर पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, रायवाडी, मांजरी, महादेवनगर, या परिसरात 622 लोकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 110 लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 512 नागरिकांचा अहवाल हा निगेटिव्ह आहे. नागरिक पुरेशी काळजी घेत नसल्यानेच, करोना वाढत असल्याने किमान आतातरी डोळे उघडले पाहिजे असे त्यांनी नमूद केले.

दंड भरू पण मास्क नाही वापरणार
करोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन, लोणी काळभोर पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंडाची वसुली सुरू केली आहे. नागरिक दंड भरायला तयार आहेत पण मास्क लावायला तयार नसल्याचे चित्र उरुळी कांचन, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या तीनही ग्रामपंचायत हद्दीत दिसून येत असल्याने दंडासोबतच आणखी कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.