निमोणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार शांताराम कटके यांनी सोमवार (दि ४) रोजी आपला उमेदवारी अर्ज पाठीमागे घेत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातुन माघार घेतली. परंतु ‘शांताराम कटके कोण आहेत हे त्यांना दाखवुन देऊ’ असं विधान करत ‘समजने वालो को इशारा काफी है’ या म्हणीप्रमाणे हा इशारा नक्की कोणाला दिलाय…? याचीच चर्चा शिरुर-हवेली मतदार संघात रंगली आहे.
शिरुर विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज कोण-कोण मागे घेतील. यावर बरीच राजकीय गणिते अवलंबून होती. भारतीय जनता पार्टीचे बंडखोर प्रदीप कंद, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे बंडखोर शांताराम कटके, संजय पाचंगे, यांच्यासह १४ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके या दोघांची थेट समोरासमोर लढत असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार शांताराम कटके यांनी उमेदवारीचा अर्ज माघारी घेतल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, मी अनेक वर्षापासुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. अजित पवार यांच्या विचारांचा सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रसार आणि प्रचार गेल्या अनेक वर्षापासुन मी करत आहे. राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर्गत जे इच्छुक उमेदवार होते. त्यांच्यापैकी कोणालाही उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा होती.
परंतु पक्षाचा कुठलाही काडीमात्र संबंध नसलेला, अजित पवार यांच्या विचारांची कास नसलेला उमेदवार आयात केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणुन मला खंत वाटली. एवढ्या दिवस राष्ट्रवादी पक्षाचा एकनिष्ठ तसेच कुठल्याही परिस्थितीत अजित पवारांची पाठ न सोडणारा मी कार्यकर्ता असताना सुद्धा माझी योग्यता पक्षाला समजली नाही याची खंत असल्याचेही कटके यावेळी म्हणाले.
शांताराम कटके यांचा पाठिंबा कोणाला…?
तुम्ही पाठिंबा कोणाला देणार…? कि महायुतीतुन बाहेर पडणार या प्रश्नाला उत्तर देताना कटके म्हणाले, आम्ही कोणाला पाठिंबा द्यायचा हे माझा परिवार, माझे मित्र आणि कार्यकर्ते असे आम्ही सर्वजण मिळून ठरविणार आहोत. आत्तापर्यंत आम्ही अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाच्या ध्येय धोरणांचा प्रचार आणि प्रसार करत आलो. परंतु अचानक ज्याचा संबंध नसलेला, विकासाच कुठलाही ज्ञान नसलेला, समाजाशी कोणतीही नाळ नसलेला आणि कोणतंही कर्तृत्व नसलेला आयात उमेदवार दिल्याने मी स्वतः संभ्रमात असल्याचे यावेळी शांताराम कटके यांनी सांगितले.
अजित पवारांना वारंवार संपर्क पण…
मी अजित पवार यांना अनेकवेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण अजित दादांकडुन माझ्या संपर्काला सन्मान मिळाला नाही. एका पदाधिकाऱ्याचा मला फोन आला होता.परंतु तो माझ्या उंचीचा नाही. त्यामुळे भविष्यात शांताराम कटके हा सगळ्यांच्या ध्याना मनात राहील असेही कटके म्हणाले. त्यामुळे आता कटके नक्की काय…? भुमिका घेणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.