कोरेगाव भीमा – येथील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रम अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने शनिवार (दि. 19) व रविवारी (दि. 20) घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी दिली.
या अभियानात 7 हजार 600 कुटुंबातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये करोना संशयित रुग्ण अढळल्यास त्याची रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे. यासाठी 211 शिक्षक, 32 ग्रामपंचायत कर्मचारी, डॉक्टर, आरोग्य सेवक आदी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत.
यासाठी 90 पथके तयार करण्यात आली आहेत. पुढील 15 दिवसानंतर पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. या अभियानाचे अंतर्गत नागरिकांनी घरीच राहून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पोलीस पाटील मालन गव्हाणे यांनी केले आहे.