पुणे जिल्हा: मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत कार्तिकी यात्रा भरवावी

आळंदीकरांच्या आरोग्याचा विचार करा ः ग्रामस्थांची मागणी

आळंदी- यंदा करोनाच्या पार्श्‍वभूमीवर आळंदीची कार्तिकी यात्रा 8 ते 14 डिसेंबर या कालावधीत होत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध संतांच्या दिंड्या आळंदीत येत असतात.

सध्या आळंदी शहरात रोज 4 ते 5 करोना बाधित रुग्ण सापडत असून कार्तिकी यात्रेवेळी होणारी गर्दी लक्षात घेता करोनाचा आळंदी शहरात शिरकाव रोखणे गरजेचे असून, त्यादृष्टीने आळंदीकरांच्या आरोग्याचा विचार करूनच कार्तिकी यात्रेचे आयोजन मोजक्‍याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात यावे अशी मागणी आळंदी ग्रामस्थांनी संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटीला निवेदन देऊन केली आहे.

हे लेखी निवेदन सह व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांनी स्वीकारले. हे निवेदन प्रातिनिधिक स्वरूपात आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने ज्ञानेश्‍वर कुऱ्हाडे, प्रसाद बोराटे, डी. एच. कुऱ्हाडे यांनी दिले. निवेदनावर भाजप सोडून इतर सर्व राजकीय पक्षांनी सह्या केल्या आहेत.

महाराष्ट्रात दोन महत्त्वाच्या एकादशींपैकी कार्तिकी एकादशीला तीर्थक्षेत्र आळंदी (ता. खेड) येथे 7 ते 8 लाख भाविकांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा समाधी सोहळा आयोजित करण्यात येत असतो. ही कार्तिकी यात्रा चार दिवसांची आहे, त्यामुळे संपूर्ण आळंदीकरांचे, तसेच पंचक्रोशीतील नागरिकांचे आरोग्य यात्रेत होणाऱ्या गर्दीमुळे धोक्‍यात येऊ शकते.

विजयादशमीनंतर आळंदी शहरात 4 ते 5 रुग्ण आढळून येत असून, कार्तिकी यात्रेत महाराष्ट्रातून येणारे भाविक भक्त, छोटे-मोठे व्यावसायिक यांच्या माध्यमातून करोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, तसेच राज्य सरकारने आरोग्यविषयक विविध उपाययोजना राबवून करोना रोगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केला आहे.

यावर विरजण पडू नये म्हणून आपल्या सर्वांच्या आरोग्याचा विचार करूनच कार्तिकी यात्रेचे आयोजन मोजक्‍याच वारकऱ्यांच्या उपस्थित करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.