हर्षवर्धन पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद ः राष्ट्रवादीची निवडणुकीतून माघार
इंदापूर- इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडणार असल्याचे चित्र मंगळवारी (दि. 12) नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले.
साखर कारखान्यासमोर असंख्य अडचणी असताना, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेवर शेतकरी सभासदांनी प्रचंड विश्वास देत, तालुक्यातील विरोधी पक्ष तसेच शेतकरी सभासद बिनविरोध संचालक मंडळ निर्माण करण्यासाठी साथ दिली. आगामी काळात हा कारखाना अडचणीतून बाहेर पडणार व नवसंजीवनी कारखान्याला मिळणार अशा अपेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागल्या आहेत.
माजी खासदार व लोकनेते कर्मयोगी शंकरराव पाटील यांनी वालचंदनगर येथील खासगी साखर कारखाना विकत घेऊन सहकारी तत्वावर उभा केला, वाढवला, नावारूपाला आणला. या सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या साखर कारखान्याला इंदापूर शहरातील गोकुळ शहा व शहा परिवाराने आदर्श कारखाना चालवण्यासाठी आजपर्यंत कायमस्वरूपी साथ दिली.
कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या निधनानंतर वरचेवर साखर धंदा अडचणीत आल्यामुळे, कारखान्यात समोरील अडचणी वाढल्या; मात्र अशा अनेक अडचणींवर मात माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या कन्या व्हा. चेअरमन पद्माताई भोसले यांनी शेतकरी सभासदांना विश्वासात घेऊन केली. कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागताच तालुक्यामध्ये हा कारखाना बिनविरोध होणार नाही, असा गवगवा मोठ्या प्रमाणात झाला. त्यातच कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकुळ शहा कुटुंबाची नाराजी अशा पेचप्रसंगातून मार्ग काढत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शहा कुटुंबीयांची नाराजी दूर करण्यात यश संपादन केले.
यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक व इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी शहा परिवाराची योग्य शिष्टाई केल्यामुळे, कारखान्याच्या संचालक मंडळात शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेल्या भरत शहा यांच्यासह नव्या चांगल्या चेहऱ्यांना संधी देता आली. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कारखाना बिनविरोध होण्यासाठी सक्षम उमेदवार नसल्याचे कारण दाखवून, कारखान्याच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली.
कारखाना अडचणीत असतानाही निवडणूक बिनविरोध होते. त्यामुळे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे कर्मयोगी शंकरराव पाटील कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार. ऊस उत्पादकांना चांगला दर मिळणार, कामगारांचे प्रश्न मार्गी लागणार अशा असंख्य अपेक्षा या कारखान्याच्या संचालक मंडळाकडून ऊस
उत्पादकांना आहेत.
शहा परिवाराला मिळणार गिफ्ट?
आगामी इंदापूर नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. शहा परिवाराचे वलय इंदापूर शहरावर तर आहेच; परंतु शेतकरी ऊस उत्पादक सभासद यांचा विश्वास प्रचंड या परिवारावर आहे. तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेबरोबर शहा परिवाराचे मनोमिलन झाले. शहा परिवाराने बाहेर न पडता कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोठा हातभार लावलेला आहे. त्यामुळे कारखान्याच्या मानाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पदाची गिफ्ट शहा परिवाराला मिळणार असे बोलले जात आहे.
21 जागांसाठी 21 उमेदवारी अर्ज
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 21 जागांसाठी फक्त 21 उमेदवारी अर्ज, नामनिर्देशन पत्र काढण्याच्या अखेरच्या दिवशी राहिले असल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे; परंतु याची अधिकृत घोषणा 22 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे संकेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले आहेत.