प्रभातच्या वृत्ताने प्रशासन खडबडून जागे
चाकण – चाकण काळूस रस्त्याचे बंद कामामुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांना मनस्ताप, नागरीक आंदोलनाच्या तयारीत अशा मथाळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित विभागाकडून रात्रीतून आश्रमच्या बाजूने असलेला सायकल ट्रॅकवरील ब्लॉक जेसीबी यंत्राच्या साह्याने उखडून तातडीने काम करण्यात आले.
दरम्यान, प्रस्तावित रस्ता नियोजित आराखडयानुसार केला नाही, अशी तक्रार रहिवासी करीत आहेत. चाकणमधील एकमेव सायकल ट्रॅकचे पेव्हिंग ब्लॉक उखडून रस्ता दुरुस्तीचा मार्ग बदलला, अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चाकण शहरातून काळूस, आगरवाडी, पठारवाडी व वाड्या- वस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम काही कारणास्तव बंद पडले होते.
स्थानिक नागरिक यांच्याकडून संबंधित खात्याला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत संबंधित खात्याकडून कुठल्याही प्रकारचे काम सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना विद्यार्थी, वृद्धांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
याला कंटाळून स्थानिक नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात होते. या प्रश्नावर दैनिक प्रभातने वाचा फोडली. प्रभातमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित खात्याकडून रात्रीतून रस्त्याचे काम उरकले आहे. याबद्दल दैनिक प्रभातचे नागरिकांनी आभार मानले.