पुणे जिल्हा : हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकाला महायुतीकडून न्याय

आमदार दिलीप मोहिते : जयंतीनिमित्त राजगुरूनगरात अभिवादन
राजगुरूनगर – गेली अनेक वर्षे हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थळ स्मारकाला निधी मिळत नव्हता.त्याबाबत विधानसभेत आवाज उठवला होता. शासनाने त्याची दखल घेत 254 कोटी रुपयांचा आराखडा मजूर केला. त्यापैकी 102 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. 32 कोटी रूपये निधीतून संपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. उर्वरित निधीतून स्मारकाची काही काही कामे सुरु झाली आहेत. काही कामाच्या निविदा प्रसिद्ध करून त्याचे काम सुरू होतील. महायुतीच्या सरकारने हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाला न्याय देण्याचे काम केले. या कामात माझा खारीचा वाटा असल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती देणारे थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची 116 व्या जयंतीनिमित्त राजगुरूनगर येथे अभिवादन करण्यात आले. राजगुरूनगर येथील जुन्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाशेजारी असलेल्या हुतात्मा स्मृतिशिल्पमधील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या पुतळ्यास विविध मान्यवरांनी पुष्पचक्र, पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी आमदार दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षा राजमाला बुट्टे पाटील, भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय डोळस, राजगुरूनगर सहकारी बँकचे अध्यक्ष दिनेश ओसवाल,
शिवसेनेचे शिंदेंगट जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर,शिवसेना उबाठा गटाच्या जिल्हा संप्रर्क प्रमुख विजया शिंदे, भाजपचे प्रदेश सदस्य राम गावडे, जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर, कालिदास वाडेकर, हिरामण सातकर, शांताराम भोसले, मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे, मनीषा टाकळकर, हुतात्मा राजगुरू प्रतिष्ठानचे मुकुंद आवटे, कोंडीभाऊ टाकळकर, मधुकर गिलबिले, निता अल्हाट, उर्मिला सांडभोर, सुदाम कराळे, मनीषा सांडभोर, मारुती सातकर, दिलीप होले यांच्यासह उपविभागीय अधिकारी (प्रांत) अनिल दौडे, उपविभागीय पोलीस अधिकरी अमोल मांडवे, राजकुमार केंद्रे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, बांधकाम अभियंता शरद मोटे आदी मान्यवरांनी हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आमदार मोहिते म्हणाले की, दरवषी हजारो राजगुरू प्रेमी राजगुरूनगर येथे येतात आणि हुतात्मा राजगुरू यांना अभिवादन व मानवंदना देतात. हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांचे देशासाठी त्याग आणि बलिदान मोठे आहे, असे त्यांनी नमूद केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी महाविद्यालय, हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकात ध्वजारोहण झाले. स्मारकात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खेड तालुक्यात शाळा महाविद्यालय, विविध संस्था संघटना यांनी हुतात्मा राजगुरू यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.





