जयवंत घोडके : बेल्हे, निमगाव सावा गटात सत्यशिल शेरकर यांचा प्रचार
बेल्हे : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा जुन्नर तालुका असून या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांना बेल्हे, निमगाव सावा जिल्हा परिषदेच्या गटातून सर्वात जास्त मतदान होणार, अशी ग्वाही पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंत घोडके यांनी दिली.
महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांच्या प्रचार दौरा बेल्हे, निमगाव सावा जिल्हा परिषदेच्या गटात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मतदारांशी संवाद साधताना घोडके बोलत होते. याप्रंसगी उमेदवार सत्यशिल शेरकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, ज्येष्ठ नेते अनंतराव चौगुले, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष तुषार थोरात, वल्लभ शेळके, खरेदी-विक्री संघाचे संचालक लहु गुंजाळ, अशोक घोडके, बेल्हे गावचे माजी सरपंच महेश बांगर, मोहन बांगर, आनंदा बेलकर, संतोष वाव्हळ, खंडु बेलकर, बाबाजी शिंदे, गोरक्षनाथ शिंदे, हनुमान शिंदे, जाणकु डावखर, पांडुरंग गाडेकर, पंकज भोसले, काशिनाथ गुंजाळ आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
घोडके म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना नऊ हजारांचे लीड या विभागातून दिले होते तसेच या निवडणुकीत जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील सर्व शिवसैनिक महाविकास आघाडीचे उमेदवाराचेच काम करणार असून गेल्या पाच वर्षांत विविध विकासकामे करण्यात विद्यमान आमदार अपयशी ठरले आहेत. श्री विघ्नहर कारखान्याच्या माध्यमातून सत्यशिल शेरकर यांचे कामकाज संपूर्ण जुन्नर तालुक्याने पहिले आहे, त्यामुळे शेरकर हे तालुक्याचा विकास करतील यात शंका नाही, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. यावेळी सत्यशिल शेरकर यांनी या भागातील पाणीप्रश्न सोडविण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामस्थ हे शरद पवार यांना मानणारा आहे. शरद पवार यांनी तालुक्यात पाच धरणे केली व यामुळे तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे. भाजपा सरकारच्या काळात शेतीच्या पिकाला कुठल्याही प्रकारचा हमी भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. त्यामुळे या भाजपा सरकारला घरी बसवा.
– लहू गुंजाळ, संचालक, खरेदी-विक्री संघ