पळसदेव : भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारिता ओळखली जाते. यामध्ये पत्रकार हे समाजमनाचा आरसा आहेत. पत्रकारांनी जिथे चूक किंवा अन्याय होतो, तिथे जरूर लिहिले पाहिजे; मात्र जिथे चांगले काम होते तिथे कौतुकदेखील केले पाहिजे. पत्रकार भवन होण्यासाठी तालुक्यातील पत्रकारांनी एक होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा, अल्पसंख्याक खात्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त इंदापूर पंचायत समितीच्या लोकनेते शंकररावजी पाटील सभागृहात आयोजित पत्रकार दिन विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तर मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप झाला. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. शेख यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम झाला.
पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाच्या दैनंदिन कामासाठी इंदापूर बस स्थानकासमोरील सार्वजनिक बांधकाम विभागाची जुनी इमारत भाडे तत्त्वावर द्यावी, असे निवेदन मंत्री भरणे यांना देण्यात आले. भरत शहा म्हणाले, शहर विकासासाठी पत्रकारांचे महत्वपूर्ण योगदान असून नगरपरिषदेच्या मालकीचे सुसज्ज पत्रकार भवन बांधून दिले जाईल. यावेळी अॅड. राहुल मखरे, छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, अॅड. शुभम निंबाळकर, किरण गानबोटे, पांडुरंग शिंदे, गफुर सय्यद, शकील सय्यद, नंदकुमार गुजर, अरविंद वाघ, धरमचंद लोढा, विधीज्ञ गिरीष शहा, अमोलराजे इंगळे, दत्तात्रय अनपट, हमीद आतार, महादेव चव्हाण यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा, जेष्ठ पत्रकार तानाजी काळे, महेश स्वामी, विधीज्ञ नारायण ढावरे, कैलास पवार यांनी पत्रकारांच्या विविध अडचणी कडे सर्वांचे लक्ष वेधले.