‘झेडपी’चे सीईओ, गटविकास अधिकाऱ्यांना दोन महिन्यांची मुदतवाढ
पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील तेरा तालुक्यांच्या पंचायत समित्यांवर आणखी दोन महिने प्रशासक कारभार राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. या अधिकाऱ्यांना प्रशासकपदी म्हणून दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पंचायत समित्यांच्या प्रशासकपदाची मुदत 13 जुलैला संपली, तर जिल्हा परिषदांची मुदत 20 जुलैला संपुष्टात येणार आहे.
जिल्हा परिषदांची 21 मार्च तसेच पंचायत समित्यांची 13 मार्च रोजी मुदत संपुष्टात आली होती. त्यानुसार राज्यातील 25 जिल्हा परिषदा तसेच 293 पंचायत समित्यांवर प्रशासक नेमण्याचे निश्चित करण्यात आले. राज्याच्या ग्रामविकास विभागाने या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन पदाधिकारी निवड होईपर्यंत जिल्हा परिषदांवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना 20 मार्चपासून 20 जुलैपर्यंत चार महिन्यांची मुदतवाढ दिली.
तसेच पंचायत समित्यांच्या प्रशासकांनाही 13 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. मे-जूनमध्ये निवडणुका होण्याची शक्यता होती. मात्र या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पंचायत समित्यांवर नेमलेल्या प्रशासकांची मुदत संपुष्टात आली आहे.
ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांसह पंचायत समित्यांच्या प्रशासकांना आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना 20 जुलैपासून, तर पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना दि. 13 जुलैपासून प्रशासक म्हणून काम करण्याची आणखी दोन महिने संधी मिळणार आहे. याबाबत ग्रामविकास विभागापाठोपाठ पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतंत्र आदेश काढले आहेत.