इंदापूर – वरकुटे खुर्द (ता. इंदापूर) येथील भुईमूग व लसून पिकात दोघांनी मिळून अफुचे (खसखस) आंतरपीक केले होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर इंदापूरचे पोलीस निरीक्षक तय्युब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने बुधवारी (दि. 2) सायंकाळी साडेपाच वाजता छापा मारून एकूण 32 किलो अफुची झाडे जप्त केली आहेत.
याप्रकरणी शेतीचे मालक पांडुरंग नामदेव कुंभार व नवनाथ गणपत शिंदे दोघे (रा. वरकुटे बुद्रुक ता. इंदापूर) यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुरेंद्र जंयवत वाघ यांनी फिर्याद दिली.
आरोपी पांडुरंग कुंभार (रा. वरकुटे बुद्रुक ता. इंदापूर) येथील जमीन गट नंबर 24 व नवनाथ शिंदे यांच्या शेतातील विहीरीच्या कडेला यांचे जमीन गट नंबर 28/3 मध्ये भुईमूग व लसून पिकामध्ये आंतरपीक म्हणुन अफु या अंमली पदार्थांच्या झाडांची थोडया थोडया अंतराने विनापरवाना, व्यापारी व व्यावसायिक हेतुने अफुचे (खसखस) झाडांची रोपे लावली होती.
ती अफूची रोपे इंदापूर पोलिसांनी छापा मारून जप्त केली आहेत. त्या झाडांचे एकूण वजन 32 किलो आहे. त्याची अंदाजे किंमत 2 लाख 11 हजार 300 रुपये एवढी आहे. वरील दोन्ही आरोपींच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तपास करीत आहेत.