-शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घोडेगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू
मंचर – आंबेगाव तालुक्यातील फुलवडे,पिंपळगाव, डिंभे, जुना आंबेगाव आणि अडविरे येथील कातकरी समाजातील नागरिकांना घरकुले आणि इतर समस्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घोडेगाव येथील तहसील कार्यालयासमोर बुधवार, दि.३ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
फुलवडे येथील १३ कुटुंबाना वन जमिनीवर घरकुले बांधण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर करून तिथे त्यांना घरकूल योजनेतून घरे बांधून द्यावी. पक्की घरे होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पत्रा शेड उभारून त्याचीच तात्पुरती व्यवस्था तातडीने करून घ्यावी. पिंपळगाव येथे स्मशानभूमीत राहणाऱ्या कुटुंबाना गावठाणच्या जमिनीवर घरकूल मंजूर करून कायमस्वरूपी निवारा द्यावा. त्यांनाही पत्रा शेड उभारून तात्पुरत्या स्वरूपात निवारा उपलब्ध करून द्यावा. डिंभे येथील तेरा कुटुंबाना घरकूल मंजूर असून जागेअभावी त्यांची घरकूल अडकून पडली आहेत. मात्र, त्यांच्या आधीच्या घरांची ग्रामपंचायतीला नोंद असूनही त्या जागेवर घरकुले बांधण्यास मनाई केली जात आहे. त्याबाबत लगेच निर्णय घ्यावा. जुना आंबेगाव येथे राहणाऱ्या २६ कुटुंबाच्या घरांची नोंद ग्रामपंचायतला करण्याबाबत निर्णय घ्यावा. आंबेगाव तालुक्यातील कातकरी समाजातील सर्वांना घरकुले उपलब्ध करणेबाबत उपाययोजना करावी. अडीवरे येथे अकरा कातकरी कुटुंबाला जागा उपलब्ध असून त्यांच्यासाठी तातडीने घरकुलाचा प्रस्ताव सादर करावा, आदी मागण्यांसाठी धरणे आदोलन सुरू असल्याचे बिरसा ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पारधी, मातृशक्ती पुणे जिल्हा बिरसा ब्रिगेडच्या अध्यक्षा उमा मते, शाश्वत संस्थेचे बुधाजी डामसे, अजित बच्चू पवार यांनी सांगितले.