उरुळी कांचन : ’शासन आपल्या दारी’ अभियानाअंतर्गत शिबिराचे आयोजन गुरुवारी (दि. 20) सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील जिजाऊ सभागृह या ठिकाणी राबविण्यात येणार आहे. अशी माहिती हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी यांनी दिली.
ग्रामपंचायत सभागृहात आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तालुक्यातील सर्व खाते प्रमुखांची व प्रतिनिधींची बैठक मंगळवारी (दि. 18) पार पडली. या संधीचा लाभ हवेली तालुक्यातील तमाम नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन हवेलीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी यांनी केले आहे. यावेळी उरुळी कांचनचे सरपंच अमित (बाबा) कांचन, माजी सरपंच संतोष हरिभाऊ कांचन, राजेंद्र कांचन, मंडल अधिकारी नूरजहाँ सय्यद, तलाठी सुधीर जायभाय, ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे आदींसह अनेक विभागांचे खाते प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या शिबिरात महसूल विभागांतर्गत येणारे उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जात/रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेवरील नाव कमी करणे, नाव वाढविणे, जीर्ण किंवा खराब शिधापत्रिका बदलणे, नवीन शिधापत्रिका अर्ज स्वीकृती, सामाजिक विशेष सहाय्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत विधवा, दीर्घकालीन आजार, दिव्यांगासाठीच्या योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा, दिव्यांग राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, नवीन मतदार नोंदणी करणे, नवीन आधारकार्ड काढणे किंवा दुरुस्ती करणे, दिव्यांगासाठी आधार कार्ड नोंदणी करणे आदी सेवा देण्यात येणार आहेत.