राजगुरूनगर -खेड तालुक्यात करोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुका लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करीत आहे. पण या स्थितीस नागरिकांचा बेफिकीरपणा आडवा येत असल्याने कुटुंबच्या कुटुंबे करोनाची शिकार होत आहेत.
खेड तालुक्यातील हॉटस्पॉट ठरलेल्या 16 गावांसह आळंदी आणि चाकण नगरपरिषदेच्या हद्दीत सुपर स्प्रेडर असणारे सर्व व्यवसायिकांच्या अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे. पाचव्या टप्यात 500 पैकी 55जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत एकूण 3 हजार 552 जणांच्या अँटीजेन तपासणीतून तब्बल 333 करोनाबाधित आढळले आहेत.
करोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन व्यवस्था अर्लट झाली असून ते आपला जीव धोक्यात घालून आहोरात्र झटत असले तरी करोना उद्रेक वाढवणारे बेफिकीर नागरिक संसर्गाबाबतचे कोणतेही नियम पाळत नसल्याने तालुक्यातील बाधितांचा आकडा वाढतच आहे.
प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या उपस्थित चाकण नगरपरीषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे आणि आळंदी नगरपरिषदेचे मुख्यधिकारी अंकुश जाधव यांनी आरोग्य कर्मचारी आणि नगरपरीषद कर्मचारी मिळून बुधवारी (दि. 24) अँटीजेन चाचणी वाढली. चाकण येथे 234 पैकी 42 तर आळंदी येथे 266 पैकी 13 असे एकूण 55 करोनाबाधित रुग्ण एकाच दिवशी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 55 पैकी 43 रुग्णांना म्हाडा कोविड सेंटरला तर 12 रुग्णांना खासगीत दाखल करण्यात आले आहे.