जुन्नर येथील कृषी बाजार समितीत आज सभा
नारायणगाव – जुन्नर तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोर धरू लागली असून माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (दि. 12) कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर येथे प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बेनके यांनी केले आहे.
जुन्नर तालुक्यात आमदार अतुल बेनके यांनी आदिवासी भागात विविध विकास कामे, रस्ते, पाणी, वीज, विजबिल माफी, साकव, धार्मिक स्थळांचा विकास केला आहे. आदिवासी दैवत बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचे काम सुरू असून लवकरच पूर्णत्वास येणार आहे.
कुकडेश्वर मंदिराच्या जिर्णोद्वारासाठी निधी उपलब्ध झाला असून कामास सुरुवात होणार आहे. आदिवासी नेते नरहरी झिरवळ यांच्या माध्यमातून अनेक आदिवासी प्रश्न सोडवण्यासाठी अतुल बेनके यांनी प्रयत्न केले आहेत.
झिरवळ यांच्या सहकार्याने हिरडा कारखाना सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. माणिकडोह धरणाच्या बॅक वॉटरमध्ये केवाडी गावाजवळ दोन गावांना जोडणारा मोठा पूल निर्माण होत आहे. आदिवासी मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी जुन्नर येथे इंग्रजी माध्यमाची शाळा व आदिवासी मुलांचे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. आंबेगाव तालुक्यातील माळीण सारखी भूस्खलनाची घटना टाळण्यासाठी जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात खबरदारीचे उपाय म्हणून 54 कोटी रुपये खर्च करून संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे, असे आमदार बेनके यांनी स्पष्ट केले.
आदिवासींच्या संरक्षणाची जबाबदारी माझी
माझ्या सामाजिक जीवनातील राजकीय कार्य आदिवासी बांधवांच्या प्रति कायम असून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी माझी राहील. त्यामुळे आदिवासी समाजाने इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे शिक्षण, सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी राज्य पातळीवर न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आमदार बेनके यांनी नमूद केले.
लांडे पिता-पुत्राचे निलंबन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल बेनके यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीचे नेत् तथा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराम सखाराम लांडे व प्रदेश उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमोल देवराम लांडे यांना जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रक काढून निलंबित केले आहे.