दिवे : श्रीक्षेत्र सासवड तेथील संत सोपानदेव महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्यातील रथाच्या पुढे चालणारा मानाचा अश्व राजा याने वयाच्या 34 व्या अखेरचा श्वास घेतला. श्रीक्षेत्र सासवड ते श्रीक्षेत्र पंढरपूर या पालखी मार्गावर दरवर्षी आषाढी वारीनिमित्त सोपानदेव पालखी सोहळ्याच्या पुढे चालत असलेला अश्व राजा याने 34 वर्षांत तब्बल 28 वेळा सासवड ते पंढरपूर अशी वारी केली आहे.
माघ शुद्ध दशमी याच दिवशी संत तुकाराम महाराज यांनी राम कृष्ण हरी या मंत्राची दीक्षा घेतली. त्यामुळे आजचा दिवस संप्रदाय क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवशी निधन झाल्याने वारकरी संप्रदाय क्षेतातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील परकाळे घराण्याकडे यांच्याकडे 100 वर्षे तीन पिढ्यापासून संत सोपानदेव पालखी सोहळ्यात अश्वाचा मान आहे. पहिल्या पिढीतील रामचंद्र भुजंगराव परकाळे, दुसर्या पिढीतील सोपान रामचंद्र परकाळे आणि तिसर्या पिढीतील अजित सोपानराव परकाळे यांच्याकडे अश्वाचा मान चालत आला आहे.
परकाळे यांच्याकडे अश्वाचा तीन पिढ्यापासून मान असून राजाने अनेक वर्षे सेवा केली आहे. आजच्या पवित्र दिवशी त्याने प्राण सोडला आहे. सोपानदेव महाराज देवस्थान ट्रस्ट, पालखी सोहळ्यातील दिंड्या आणि वारकर्यांच्या वतीने सोपान देवांचा सेवक लाडक्या राजाला भावपूर्ण श्रद्धांजली.
– अॅड. त्रिगुण महाराज गोसावी, प्रमुख विश्वस्त, संत सोपानदेव महाराज देवस्थान, सासवड