बेल्हे : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून जिवंत सातबारा नोंदी राबवणारी मोहीम महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल पासुन हाती घेतली आहे. ज्या सातबारावर मृत व्यक्तीची नावे आहेत त्यांच्या वारसांकडून कागदपत्रे घेऊन वारसनोंदी करणारी मोहीम शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे. दरम्यान, बोरी बुद्रुक येथील एका मयताच्या वारसांच्या नोंदी तब्बल 41 वर्षानंतर मंगळवारी (दि. 25) करण्यात आली.
जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथे तहसील कार्यालय जुन्नर विभागाच्या माध्यमातून, ग्रामपंचायत बोरी बुद्रुक व ग्राम महसूल अधिकारी कार्यालय बोरी बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमा अंतर्गत जिवंत सातबाराची नोंद ही मोहीम बोरी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा शिंदेवाडी या ठिकाणी राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये गावातील नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या वारस नोंदीची पूर्तता करून घेतली आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून ज्या मृत व्यक्तीच्या वारसांच्या नोंदी झालेल्या नाहीत. त्या व्यक्तीकडून तात्काळ प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रे घेऊन वारस नोंदी करण्यात आली. बाळाजी कोंडाजी शिंदे या मयत व्यक्तीच्या वारसांच्या नोंदी तब्बल 41 वर्षानंतर करण्यात आली. जुन्नर तालुक्याचे तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांनी या मोहिमेची माहीती दिली.
या मोहिमेच्या निमित्ताने मंडल अधिकारी राजेश ठुबे, ग्राम महसूल अधिकारी प्रल्हाद वाळुंज, ग्रामसेविका मंगल भोईर, सरपंच वनिता डेरे, ग्रामपंचायत सदस्य सुनील जाधव, नामदेव शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष युवराज कोरडे, पोलीस पाटील विघ्नेश जाधव, महा ई सेवा केंद्राचे नवनाथ जाधव, महसूल कर्मचारी जावेद यनियार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.