शिक्रापूर -येथील चाकण रस्त्यावरील मांढरे वस्ती परिसरात शिक्रापूर पोलिसांनी रविवारी (दि. 27) छापा टाकला होता. यामध्ये अवैधरित्या साठविलेला गुटखा तब्बल 41 लाख रुपयांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप उमाशंकर गुप्ता (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी क्रांती बारवकर यांनी फिर्याद दिली आहे. शिक्रापूर येथील चाकण रस्ता मांढरे वस्ती परिसरात एका इमारतीमध्ये अवैधरित्या गुटख्याचा साठा केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली होता.
त्यानुसार सहायक निरीक्षक विक्रम साळुंके, तेजस रासकर, रवीकिरण जाधव, अंबादास थोरे, अशोक केदार, विकास मोरे आदींनी संबंधित ठिकाणी धाड टाकून गुटखा जप्त केला. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागास माहिती देण्यात आल्यानंतर क्रांती बारवकर पोलीस ठाण्यात आल्या व जप्त गुटख्याचा पंचनामा केला. त्यामध्ये वेगवेळ्या प्रकारचा विक्रीस बंदी असलेला पानमसाला, सुगंधीत सुपारी, विमल पान मसाला असा 41 लाख 72 हजार 628 रुपये किमतीचा गुटखा मिळून आला.