आळेफाटा : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील प्रगती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या तत्कालीन संचालक मंडळावर 2 कोटी 85 लाख 46 हजार 896 रुपयांचा अफरातफर केल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यामध्ये 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे जुन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक दिनेश तायडे म्हणाले की, बोरी बुद्रुक येथील प्रगती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.या संस्थेचे 2016 ते 2022 या कालावधीत असलेले तत्कालीन संचालक मंडळ व व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2016 ते 2022 या कालावधीचे वैधानिक लेखापरिक्षण करण्यासाठी सहा निबंधक, सहकारी संस्था, जुन्नर यांनी प्रमाणित लेखा परिक्षक संतोष दशरथ बांगर यांची नियुक्ती केली होती.
त्यानुसार पतसंस्थेचे 2016 ते 2022 या कालावधीचे वैधानिक लेखापरिक्षण करीत असताना या कालावधीमध्ये संस्थेचे तत्कालीन संचालक मंडळ, तत्कालीन व्यवस्थापक यांनी संगनमताने ठेवीदारांच्या खात्यामध्ये चुकीच्या नोंदी व रोजकिर्दला चुकीचा जमा खर्च करून गैरव्यवहार व अपहार केलेला आहे. सहकार कायदा व पोट नियमांचे उल्लंघन केलेले आहे. या संदर्भाची फिर्याद लेखा परीक्षक संतोष दशरथ बांगर यांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करत आहेत.
अशी केली अफरातफर, फसवणूक
संस्थेची चुकीची आर्थिक पत्रके तयार करून संस्थेची खरी आर्थिक परिस्थिती दडवून, चुकीचे वार्षिक अहवाल तयार करून, नियमबाह्य बोगस कर्ज वितरण करणे, बँकेच्या ठेवी परस्पर काढून त्याची विल्हेवाट लावणे, वार्षिक सभा व मासिक सभा इतिवृत्तांत नोंद वह्या ठेव खतावणी, कर्ज खतावणी, सभासद कर्ज अर्ज, सभासद कर्ज प्रकरणे तपासणीसाठी लेखापरिक्षणास सादर न करणे तसेच यामध्ये 2 कोटी 85 लाख 46 हजार 896 रुपयांचा गैरव्यवहार करून अफरातफर व फसवणूक केल्याचे आढळून आले आहे.
यांच्यावर गुन्हा दाखल
संस्थेचे तत्कालीन संचालक मंडळ संदीप की. कोरडे, रमेश हनुमंत जाधव, राजेंद्र नारायण घोलप (मयत), चंद्रकांत देवराम जाधव, राम वसंत बढे, बन्सी नाथा कोरडे, खंडेराव जानकु कोरडे, संजय दशरथ जाधव, अविनाश मनोहर गुंजाळ, संजय पांडुरंग हलकरे, सुशिला भिकाजी जाधव, अरूणा सुरेश जाधव (सर्व रा.बोरी बुद्रुक, ता. जुन्नर) तत्कालीन व्यवस्थापक संतोष ज्ञानदेव साबळे, रितेश सोपान पानसरे (दोघे रा. साकोरी ता.जुन्नर).