जेजुरी -अनेक राज्यात ललित कला अकादमी केंद्र असून महाराष्ट्र राज्यात मात्र, कलावंतांची उपेक्षा झाली होती. हे कला अकादमी केंद्र महाराष्ट्रात उभारले जावे, याकरिता राज्यातील शिल्पकार मूर्तिकार चित्रकार आदींनी दिल्ली येथे चाळीस वर्षे संघर्ष केला होता. अखेर महाराष्ट्रातील कलावंतांच्या संघर्षाला यश मिळाले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी पुणे, पिंपरी- चिंचवड परिसरात हे ललित केंद्र उभारण्यास मंजुरी दिल्याची घोषणा अकादमीचे अध्यक्ष उत्तमराव पाचर्णे यांनी जेजुरी गडावर येऊन जाहीर केली.
महाराष्ट्र शासन लवकर अकादमीचे करार पूर्ण करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. पिंपरी चिंचवडच्या हद्दीत बालविकास मंदिराच्या जागी मिळत असल्याचे पाचर्णे यांनी सांगितले. यावेळी ख्यातनाम ज्येष्ठ शिल्पकार चित्रकार दिनकर थोपटे उपस्थित होते. श्री मार्तंड देवसंस्थान समितीच्या वतीने पाचर्णे आणि त्यांच्या परिवाराचा सन्मान करण्यात आला.
जेजुरी ही कला सांस्कृतिक अशी पवित्र देवभूमी असल्याने याठिकाणी ही घोषणा माझ्याकडून होत असल्याचा आनंद पाचर्णे यांनी व्यक्त केला. ललित कला अकादमीची स्थापना भारतीय कला संस्कृती परंपरेचे जतन व संवर्धन करण्याकरिता केंद शासनाने शासकीय प्रशासनाच्या बंधनातून मुक्त, अशी स्वायत्त राष्ट्रीय स्तरावरील संस्था 1945 मध्ये स्थापन केली आहे.