बारामती : ऑनलाइन रमीच्या नादात बारामतीतील जिरायत पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी चक्क चोरीचा मार्ग स्वीकारत परिसरातील शेतकऱ्यांच्या २० कृषीपंपाची चोरी केली आहे. वडगाव निंबाळकर पोलिसांनी धडक कारवाई करीत ६ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ३ लाख १६ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तालुक्यातील लोणी भापकर, साहेबाचीवाडी तसेच बारामती परिसरातीत कृषीपंपाची चोरी केल्या आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी ही माहिती दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे उपस्थित होते.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील लोणीभापकर, सायंयाचीवाडी हद्दीतील शेतकरी यांचे शेतातील विहिरीतील व बोरमधील पाणबुडी इलेक्ट्रीक कृषीपंप झाल्याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांच्या विहिरीतील तसेच बोरवेलमधील कृषीपंप चोरी होत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी याबाबत शोध मोहीम सुरू केली. चोरीची माहिती काढत शिताफीने तपास करत पोलिसांनी सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यात आरोपी ओंकार राजेश आरडे (वय २५ रा. लोणीभापकर, ता. बारामती), महेश दिलीप भापकर (वय ३१ रा. लोणीभापकर), अमोल लहु कदम (वय २८ रा. जळकेवाडी, ता. बारामती), निलेश दत्तात्रय मदने (वय २८ रा. लोणीभापकर), प्रथमेश जालिंदर कांबळे (वय २२ रा. लोणीभापकर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवताच आरोपींनी चोरीची कबुली दिली.
कालीदास शिवाजी भोसले (रा. लोणीभापकर) यास विकल्याची कबुली दिली. भोसले याच्याकडे तपास केला असता त्याने मोटारी खरेदी केल्याची कबुली दिली. या अटक सत्रातून १७ गुन्हे उघड झाले आहेत. आरोपींकडून अधिक मोटार चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गुन्ह्याची उकल पोलिसांनी केल्याने त्यांना दहा हजार रुपयांचे पारितोषिक अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी जाहीर केले. परिसरातील नागरिक तसेच शेतकऱ्यांनी पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला.
ऑनलाइन रमीच्या नादात मुलांनी चोरीचे कृत्य केले आहे. यातील एका आरोपीने स्वतःच्या वडिलांच्या विहिरीवरील मोटर देखील चोरली आहे. ही शेतकऱ्यांचीच मुले आहेत. यापूर्वी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळून आली नाही. ऑनलाइन रमी खेळण्याचा नाद लागल्याने ही मुले या थराला पोहोचले आहेत. ही बाब दुर्दैवी आहे. गावातील रीत परिसरातील शेतकऱ्यांचीच मुले चोरी करत असल्याने त्यांचा सुगावा लागणे कठीण होते. मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी अत्यंत सीताफिने हा प्रकार उघडकीस आणला.
-अप्पर पोलीस अधीक्षक, गणेश बिरादार.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक अविनाश शीळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोसई राहुल साबळे, दिलीप सुतार, पोलीस हवालदार अनिल खेडकर, तौफिक मनेरी, महेश पन्हाळे, सूर्यकांत कुलकर्णी, भाऊसो मारकड, सहायक फौजदार बाळासाहेब कारंडे, सुनील बालगुडे, हवालदार हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, सागर चौधरी, आबा जाधव, सूरज धोत्रे, विजय सेंडकर, शाहूराज भोसले, नागनाथ परगे ,विलास ओमासे, धनंजय भोसले, राजेंद्र सावंत, सोमनाथ ढाणे ,भानुदास सरक, विकास येटाळे, अरुण सोनवणे आदींनी ही कामगिरी केली.