शिरूर – तालुक्यातील मलठण येथे शेतजमिनीमधील पाइपलाइन न विचारता उकरल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला दमदाटी, शिवीगाळ करत लाकडी दांडके, लोखंडी पाइप व कुऱ्हाडीच्या साहय्याने मारहाण करण्यात आली. यात शेतकरी जखमी झाला आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी येथील अनिल भाऊ कोळपे यांच्या घराच्या पाठीमागील शेत जमिनीमधील पाइप लाईन तेथील गेणभाऊ कोळपे, संजय शिंदे, अक्षय शिंदे, धोंडीबा कोळपे, बारकाबाई कोळपे यांनी न विचारता बेकायदा जमाव जमवून उकरली. त्याचा जाबविचारण्यासाठी गेलेल्या अनिल यांना त्यांनी शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडके, लोखंडी पाइप व कुऱ्हाडीच्या साहय्याने मारहाण करत जखमी केले.
याबाबत सुनील भाऊ कोळपे (वय २६, रा. शिंदेवाडी मलठण) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी गेणभाऊ धोंडिबा कोळपे, संजय बाळू शिंदे, अक्षय विलास शिंदे, धोंडिबा माखा कोळपे, बारकाबाई गेणभाऊ कोळपे (सर्व रा. शिंदेवाडी मलठण) यांच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भगत करत आहे.