पेठ – चोरट्याने घरात प्रवेश करत गळ्यातील दागिने चोरण्याचा प्रयत्न करत ज्येष्ठ महिलेला गंभीर मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. 23) रात्री आठ वाजता पेठ गावात घडली.
किसाबाई सीताराम ढमाले (वय 65) असे या महिलेचे नाव आहे. त्या घरी एकट्याच राहतात. रात्री साडेसात वाजता त्यांच्या घरात लाईट नसल्याने त्या शेजारी भाचा शशिकांत ढमाले यांच्या घरी वाटण वाटण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करत तो बाथरूममध्ये लपून बसला. किसाबाई ढमाले या वाटण वाटून परत आल्या.
घरात आल्यानंतर किसाबाई ढमाले यांनी घराच्या गेटला व दरवाजाला आतून कडी लावून त्या घरात काम करत असताना बाथरूम मध्ये लपलेल्या अज्ञात चोरट्याने बाहेर येत किसाबाई ढमाले यांचा जोरदार धक्का देऊन त्यांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी किसाबाई ढमाले यांनी आरडा ओरडा करत चोरट्याला पकडून ठेवले. दोघांमध्ये झटापट झाली,
आपण पकडले जाऊ या भीतीने चोरट्याने किसाबाई ढमाले यांना मारहाण केली.. किसाबाई ढमाले यांचा आवाज ऐकून त्यांचा भाचा शशिकांत व नातेवाईक घराबाहेर आले असता दरवाजाला आतून कडी लावल्याने त्याला दरवाजा उघडता येत नव्हता. बाहेर कोणीतरी आल्याचा अंदाज येताच चोरटा घराच्या मागच्या दरवाजा उघडून भिंतीवरून उडी मारून पळून गेला. या घटनेत ज्येष्ठ महिलेच्या अंगावरील दागिने चोरीला गेले नसले तरी तिला मारहाण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दोन दिवसांपूर्वी रेकी
चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरटा दोन दिवस अगोदर पाणी पिण्यासाठी घरात आजीकडे आला होता त्याचवेळी त्यांनी परिसराची रेकी केली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. पेठ गावात या अगोदरही अशा प्रकारच्या दोन-तीन घटना घडल्या असून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य आणि युवा उद्योजक संजय पवळे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य अशोक राक्षे यांनी केले आहे.