खेड तालुक्यातील बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी
आळंदी – दिवाळीच्या खरेदीसाठी खेड तालुक्यातील चाकण, आळंदी, राजगुरूनगर, वाडा आदी बाजारपेठांमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांनी केलेल्या खरेदीमुळे तालुक्यातील बाजारपेठांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. नवीन खरेदीमुळे नागरिक समाधानी झाले आहेत. तर, चांगला व्यवसाय झाल्याने व्यापारी वर्ग उत्साही आहे.
दीपावली सणाच्या अगोदर पासूनच बाजारपेठांमधील किराणा दुकानदार, कपड्याचे दुकानदार, इलेक्ट्रॉनिक दुकानदार याशिवाय सजावटीची आणि इलेक्ट्रीक दुकानदार, तसेच सराफी दुकानदार यांचे व्यवसाय या काळात प्रचंड तेजीत आले होते. त्यामुळे सर्वच ठिकाणच्या बाजारपेठांत व्यापारी क्षेत्रात मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते.
तर दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहकांची देखील प्रचंड ही होत होती. दिवाळी सणापूर्वी दिवाळीचे पदार्थ तयार करण्यासाठी लागणार्या किराणा दुकानांमध्ये व मोठ्या मॉलमध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती. याशिवाय दीपावलीच्या मुहूर्ताच्या काळात सराफी दुकान, मिठाईचे दुकान यामध्ये देखील खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.
नागरिकांकडून सढळ हाताने खरेदी –
दिवाळी पूर्वीच काही महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले होते. याशिवाय सरकारी कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान आणि खासगी कंपन्यांमधील कामगारांना बोनसची रक्कम हातात आली होती. त्यामुळे यावर्षी जवळपास सर्वच नागरिकांनी सढळ हाताने खर्च करीत दिवाळीचा सण जोरदार आणि उत्साहाने साजरा केला.
भाऊबीज संपताच बाजारपेठेत शुकशुकाट
यंदा दिवाळीत नागरिकांनी वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक साहित्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली. तर काही कुटुंबीयांनी अनेक वर्षांचे स्वप्न म्हणून गृह खरेदी केली. त्यामुळे बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. परंतु भाऊबीजेचा सण संपताच बाजारपेठेत पुन्हा शुकशुकाट झाला आहे. साधारणतः भाऊबीजेनंतर दिवाळीतील प्रमुख सण संपतात, त्यामुळे आता बाजारपेठेत देखील गर्दी ओसरताना दिसत आहे.