स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा
मंचर – सरकार कोणातेही असले तरी आम्हाला भांडावं लागणार आहे. शेतकरी सरकारकडे जगावेगळे काही मागत नाही. आम्ही दुधाला चाळीस रुपये हमीभाव मागतोय. लोकसभेला फटका बसला, त्यामुळे सरकार घाबरले विधानसभेला फटका बसायची वाट पाहू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवार दि.३ रोजी सरकारला दिला.
दुधाला किमान ४० रुपये दर मिळावा, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथे दूध परिषद व शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर, मंचर येथील विकास दुध संस्थेचे अध्यक्ष बाबाजी खानदेशे,वनाजी बांगर, प्रकाश कोळेकर, रामदास बांगर, रामनाथ बांगर, बाळकृष्ण बांगर, मारुती गोरडे रोहिदास कुटे,गणेश दौंड, भूषण आवटे, मंगेश बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, पशुखाद्याच्या किमती वाढल्या, चारा वाढला, मजुरांचीही संख्या कमी झाली. गाय विकता येत नाही आणि दूध धंदाही तोट्यात आहे, अशी शेतकऱ्याची अवस्था झाली आहे. चाळीस रुपये हमीभाव मागतोय. दूध भुकटी भाव पडले की पाडले? हे मला माहीत नाही. मात्र, या कंपन्यांनीच दुधाचा खेळखंडोबा करून ठेवला. जर आयात केलेली दूध भुकटी आली तर दुधाचे भाव २० रुपयांपेक्षाही कमी होतील. अनुदान देताना आडकाठी घातल्या जातात. अनुदान देताना कुठली अट ठेवू नका.
अनुदान थेट शेतकऱ्याच्या नावावर जमा करा. तसेच तुमच्या गावात येणाऱ्या पुढार्यांना दुधाने अंघोळ घाला, पुढार्यांना आमचे तुमच्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे आम्ही तुमचा दुग्धाभिषेक करत आहोत, असे सांगा आता शेतकऱ्यांनी संघटित व्हा. त्याशिवाय शेती पिकांना बाजारभाव मिळणार नाही, असेही राजू शेट्टी म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातगाव पठार अध्यक्ष संतोष पवार, तालुका अध्यक्ष तुकाराम गावडे, संतोष इंदोरे, सविता दीपक पोखरकर, नवनाथ पोखरकर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बांगर यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन माजी उपसरपंच संदीपभाऊ वाबळे यांनी केले.
अनुदान नको भाव द्या…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे न्याय हक्कासाठी शेवटपर्यंत लढणार असून आम्हाला अनुदानाची भीक नको तर दुधाला चाळीस रुपये दर द्या. पाच रुपयाचे गाजर दाखवता व दुधाची भुकटी आयात करतात. अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी सरकारवर केली. यावेळी ते म्हणाले की, विविध गोष्टींवर कर लावून शेतकऱ्यांचे शोषण सुरू आहे. हे शोषण थांबवा व शेतकऱ्यांना न्याय द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.