पापमोचनी एकादशीनिमित्त माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी
आळंदी – पापमोचनी एकादशीनिमित्त सोमवारी (दि. 28) अलंकापुरीत भाविकांनी माऊलीच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती. इंद्रायणीचा काठ प्रखर उन्हाचा तडाखा असूनही गर्दीने फुलून गेला होता.
पहाटे माऊलींना दुग्धाभिषेक, जलाभिषेक, काकडा इतर धार्मिक पूजा व श्रींना नैवेद्य या देवस्थानच्या विविध धार्मिक दिनचर्याने पापमोचनी एकादशीस प्रारंभ झाला. तद्नंतर पहाटे माऊलींचे दूरूनदर्शन भाविकांसाठी खुले करण्यात आले. दर महिन्याप्रमाण सोमवारी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम पार पडले.
करोनाचे निर्बंध शितील झाल्याने गर्दीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्यामुळे व्यापारी वर्गाला देखील सुगीचे दिवस येण्यास सुरुवात झाली आहे. भाविकांचा तीव्र उन्हापासून बचाव व्हावा म्हणून देवस्थानच्या वतीने संपूर्ण महाद्वारात सावलीसाठी नेट बसविण्यात आले आहे.
दर्शन बारीतून मंदिरात प्रवेश करताना बाहेर बॅरिकेट्स लावले असताना देखील दुचाकीस्वार आपल्या दुचाकी रस्त्यावरच पार्किंग करत असल्याने भाविकांना मंदिरात प्रवेश करताना अडथळा निर्माण होतो आहे. तरी देखील पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत तरी संपूर्ण महाद्वार परिसर खुला करावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. येत्या गुढीपाडव्याला माऊलींचे स्पर्श दर्शन सुरू होईल, अशी शक्यता देवस्थान कडून वर्तवण्यात येत आहे.