एक हजार तरुणाई भाजपात जाणार : हाय कंमाडकडून पक्षप्रवेश सोहळ्याबाबत गुप्तता
बारामती : गेल्या तीन महिन्यांपासून चर्चेत आलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील एक हजार युवकांचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दौरा नियोजित असल्याने राज्यातील मातब्बर नेते बारामतीच्या गडात कार्यक्रमापूर्वी वातावरण निर्मिती करीत आहेत.
भाजपच्या मिशन 45 मध्ये बारामती लोकसभेचा समावेश आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघ
चर्चेत आला आहे. त्यासाठी बारामती मतदारसंघ भाजपने लक्ष केला आहे. (दि.6) चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर येथील जवळपास एक हजार युवकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे वृत्त असून याबाबत सर्व तयारी झाली आहे. या प्रवेश सोहळ्यातून राष्ट्रवादीसाठी धक्कातंत्र वापरले जात आहे.
देशात भाजपचे 400 हून अधिक खासदार निवडून आणण्याचे लक्ष भाजपच्या वरिष्ठ कार्यकारिणीने ठेवले आहे. ज्या ठिकाणी 2019 मध्ये भाजप दुसऱ्या स्थानावर होते. त्या ठिकाणी भाजप पूर्ण ताकदीने लढणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर मतदारसंघाचा समावेश आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. गेली 50 वर्षे पवार यांची बारामतीवर सत्ता आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी बारामतीचा गड काबीज करण्याचा चंग बांधला असून तरुणांचा होणारा प्रवेश हा मतदानावर परिणामकारक ठरणार असल्याचे भाजपाच्या गोटातून बोलले जात आहे. दरम्यान, अनेक संघटना, कला क्रीडा क्षेत्रातील तरुणाई भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त असल्याने पवार गटाला धक्का मानला जात आहे.
वरिष्ठ पातळीवरून सूत्रे फिरवली
दरम्यान, भाजपच्या प्रवेशाबद्दल गुप्तता पाळली असून राष्ट्रवादीच्या गोटात याची तुसभर सुद्धा माहिती नाही. त्यामुळेच भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून प्रवेशाची सूत्रे फिरवली असून या पक्ष प्रवेशाचा सूत्रधार कोण आहे, हे उद्या कार्यक्रम झाल्यावरच समजणार आहे. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात वातावरण तापवले आहे. त्यात अजित पवार यांनी “स्वागतच’ असेल, असे वक्तव्य करून भाजपाच्या गोटातील हवा काढली आहे. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दौऱ्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.