नगरपरिषदेच्या शर्यतीतून अनेक इच्छुकांना कात्रजचा घाट : 41 ठिकाणी चुरशीचे संकेत
प्रमोद ठोंबरे
बारामती – बारामती नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत (दि.13) रोजी बारामती नगरपरिषदेच्या सभागृहात जाहीर झाली. यामध्ये 20 प्रभागांतील 41 जागांपैकी 21 जागा महिलांना राखीव ठेवण्यात आल्याने अनेक इच्छुकांचा “करेक्ट कार्यक्रम’ झाल्याने मोठा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीनंतर हे इच्छुक शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
बारामती नगरपरिषद हद्दीतील एकूण 1 लाख 8 हजार 152 लोकसंख्येपैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या 20 हजार 326 आहे. त्यानुसार अनुसूचित जातींसाठी आठ जागा आरक्षित ठेवल्या आहेत. त्यामुळे या प्रभागात आरक्षित जागांसाठी प्रबळ इच्छुक पुढे सरसावणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.
नव्याने जाहीर झालेल्या प्रभागामध्ये मोठे फेरबदल झाल्याने शहरातील अनेक दिग्गजांचा चांगलाच कस लागणार आहे. तर आरक्षण सोडत झाल्यावर गटा- तटाचे आपला प्रभाग सुरक्षित करण्यासाठी होणाऱ्या घडामोडी पाहण्यासाठी बारामतीकर उत्सुक आहेत. आगामी पाच वर्षांत बारामती नगरपालिकेत महिला सदस्यांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असेल. सोडतीनंतर आता अनेकांनी प्रभाग निश्चित करुन नगरसेवकपदासाठी फिल्डिंग लावण्यास प्रारंभ केला आहे. सोडतीमधून काहीना दिलासा तर काहींचे वॉर्ड राखीव झाल्याने “कही खुशी, काही गम’ असेच वातावरण आहे.
जाहीर झालेल्या 41 जागांपैकी तब्बल 21 जागांवर महिलांसाठी आरक्षण असल्यामुळे पुरुषांना 20 जागा मिळणार आहेत. शासनाने धोरण बदलले असल्यामुळे नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे, त्यामुळे नगरसेवकांच्या मताला अधिक किंमत प्राप्त होणार आहे. एक ते 19 या प्रभागांत दोन नगरसेवक तर शेवटच्या विसाव्या प्रभागात तीन नगरसेवक निवडून येतील. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक इच्छुक आरक्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये 20 प्रभागांतील 41 जागांसाठी आरक्षण घोषित करण्यात आले.
दिग्गजाची प्रतिष्ठा पणाला
शहरातील अनेक प्रभागात फेरबदल झाले आहेत. त्यामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात गट- तट उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. फेरबदल हे अनेक विद्यमान आणि इच्छुकांना डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे राजकीय आणि गट- तटाचा समतोल साधत निवडणूक लढवावी लागणार असल्याचे चिन्हे आतापासून दिसत आहे.
नगरपरिषदेत महिला सरस
41 जागांपैकी तब्बल 21 जागांवर महिलांसाठी आरक्षण आहे. यात पुरुषांना 20 जागा मिळणार आहेत. येत्या निवडणुकीत महिला प्रतिनिधित्व एका जागेने तरी जादा असणार आहे. यावेळी प्रभागात महिलांना संधी जादा मिळणार आहे. तसेच सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रभावी काम असणाऱ्या महिलांना आणि निवडणुकीसाठी आर्थिक रसद पुरविणाऱ्या इच्छुकांना यावेळी स्थान मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रभाग 20 मध्ये तीन नगरसेवक आहेत. त्यामुळे इच्छुकांना या प्रभागात संधी मिळणार आहे.