पहाटेपासूनच नागरिक लसीकरणासाठी रांगेत ताटकळले
सरपंच रमेश गडदे यांची मध्यस्थी
शिक्रापूर – काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शिक्रापूर येथे आज करोना लस उपलब्ध झाली. लसीकरणासाठी पहाटेपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या. यादरम्यान सकाळीच लसीकरण ठिकाणी गोंधळ झाला; मात्र सरपंच रमेश गडदे यांच्या तत्परतेने गोंधळ निवळत लसीकरण सुरळीत करण्यात आले आहे.
शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेत आज आरोग्य विभागाच्या वतीने 500 नागरिकांना कोविड लसीकरण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी नागरिकांनी पहाटेपासून रांगा लावल्या. काही ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी लसीकरणसाठी नागरिकांची नावे लिहून घेत नंबर लावले होते.
सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास या लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी संतोष चोपडा, रुपाली मोरे यांसह काही आशा सेविकांच्या माध्यमातून लसीकरण सुरू होते. नागरिक रांगेत असताना काही कार्यकर्त्यांनी मध्येच वेगळे नंबर घेत काही लोकांचे लसीकरण करून घेण्यास सुरवात केली. यावरून गोंधळ उडाला. अखेर सरपंच रमेश गडदे, उपसरपंच रमेश थोरात, माजी उपसरपंच सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सासवडे, प्रकाश वाबळे यांसह आदींनी हस्तक्षेप करत नागरिकांच्या रांगा यादी व नंबर प्रमाणे सुरळीत करून घेत लसीकरण सुरळीत केले.
शिक्रापूर गावामध्ये होणाऱ्या लसीकरणावर ग्रामपंचायतच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जात आहे. यापुढे लसीकरण केंद्रावर गोंधळ व वाद होऊ नये म्हणून टोकन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.
-रमेश गडदे, सरपंच