पुणे जिल्हा: मालमत्ता करात आजी, माजी सैनिकांना सवलत

राज्य शासनाच्या निर्णयाचे भोर तालुक्‍यात स्वागत

भोर -आजी, माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करामधून सवलत देण्याबाबत राज्य शासनाला भोरच्या माजी सैनिक विकास सेवा संस्थेतर्फे विनंती केली होती. त्यानुसार ग्रामीण भागातील आजी-माजी सैनिकांना मालमत्ता करामधून सवलत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाचे भोर तालुक्‍यात स्वागत होत आहे. 

माजी सैनिक विकास सेवा सस्था भोर वेल्हे संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब समगिर यांनी ग्रामीण भागातील सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करात सवलत मिळावी म्हणून राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून शासनाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा 3 कलम 124 व त्याअंर्तगत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम 1960 मधील तरतुदीनुसार पंचायतींना कर व फी आकारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील आजी माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावुन जीवाची पर्वा न करता देशाचे संरक्षण करत आहेत.त्यांनी केलेली देशाची सेवा विचारात घेऊन आजी माजी सैनिकांना दिलासा व त्याचे मनोबल उंचावून त्यांना उचित सन्मान देण्याच्या अनुषंगाने शासनाने ग्रामपंचायत मालमत्ता करामधून सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भोर, वेल्हे तालुक्‍यातील सुमारे 550 आजी माजी सैनिकांना याचा लाभ होणार असल्याचे अध्यक्ष नानासाहेब समगिर यांनी सांगितले.

यावेळी भोर पंचायत समितीत माजी सैनिक संघटनेच्या वतीने नानासाहेब समगिर यांच्या हस्ते गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपसभापती अमोल पांगारे, विस्तार अधिकारी राजेंद्र चांदगुडे, बरके उपस्थित होते.

ग्रामीण भागातील आजी माजी सैनिकांना एका निवासी इमारतीला ग्रामपंचायत करामधून सवलत मिळणार आहे. तसा शासनाने आदेश काढला आहे. तो आदेश प्राप्त झाला आहे. याबाबत सर्व ग्रामसेवकांना सुचना देण्यात आल्या आहेत. अशा करमाफीस पात्र सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे प्रमाणात सादर करणे गरजेचे आहे.
– विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी भोर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.