दीपक काटे यांचा इशारा
बारामती – संभाजी ब्रिगेड ही संघटना नेहमीच अन्याय, अत्याचाराविरोधात आवाज उठवताना पाहिले आहे. मात्र, अनेकवेळा संभाजी ब्रिगेड असा उल्लेख होत असल्याने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान होत आहे. पंधरा दिवसांत नावात बदल करावा किंवा करणार असल्याचे समाज माध्यमांवर माहिती प्रसारित करावी; अन्यथा याबाबत तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांनी दिला.
दीपक काटे म्हणाले की, संभाजी ब्रिगेडने आंदोलन,निदर्शन, विविध मोर्चेच्या संदर्भातील वृत्त वाचत असताना संघटनेच्या नावामध्ये अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख (‘संभाजी’ ब्रिगेड) होत आहे, त्यामुळे संघटनेच्या कार्यावर प्रसारमाध्यमे किंवा जन माणसातील प्रतिक्रिया देत असताना छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होत असून याची खंत माझ्यासह महाराष्ट्र व शिवप्रेमी व शंभूप्रेमींना होत आहे.
त्यांच्या भावनांचा आदर करून आपल्या संघटनेच्या नावामध्ये योग्य तो बदल करावा. जोपर्यंत नावात बदल होत नाही तोपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी वापर करून त्यांची विटंबना करून शिवप्रेमी व शंभूप्रेमीच्या भावना दुखावू नये, अशी मागणी त्यांनी केली.