शिरूर – शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या बदली झाल्याने शिरूरच्या पोलीस निरीक्षकपदी संदेश केंजळे यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या चार वर्षांत शिरूर शहरासह तालुक्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख सर्वसामान्यांना अस्थवस्थ करणारा आहे. त्यातच नव्याने रूजू होणाऱ्या केंजळे यांच्यासमोर गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आव्हान आहे.
गुंजवटे यांच्या कार्यकाळात शिरूर शहरासह पोलीस स्टेशन हद्दीत सोनसाखळी चोरी, शेतकर्यांचे कृषी पंप, विद्युत रोहित्र, केबल चोरी, दुचाकी, चारचाकी गाडयांची चोरी, अल्पवयीन मुली-महिला गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक गुन्हे घडले असून त्या गुन्ह्यांची अद्यापही उकल झाली नाही. शिरूर शहरासह ग्रामीण भागात जुगार, मटका, गांजा विक्री, दारु विक्री, गुटखा, वेश्या व्यवसाय या अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला असून यांचा बिमोड करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्यापुढे आहे.
केंजळेंकडून दबंग कामगिरीची अपेक्षा
शहरासह तालुक्यात जुगार, मटका, गुटखा विक्री, अवैध दारु, गांजा विक्री तसेच गॅस रिफिलींग व्यवसाय जोमात सुरु असून त्यांना आवर घालणार घालण्यास प्रयत्न होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल. शिरूर शहरामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. याला आवर घालणे महत्वाचे आहे. शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शिरूरकरांना केंजळे यांच्याकडून दबंग कामगिरीची अपेक्षा आहे. आता अपेक्षेत केंजळे हे किती खरे उतरतात, याची उत्सुकता लागून राहिली आहे.